सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या
By प्रज्ञा म्हात्रे | Published: August 22, 2023 06:20 PM2023-08-22T18:20:20+5:302023-08-22T18:21:09+5:30
देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत.
ठाणे : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. अंगीभूत असलेल्या कला कौशल्य, जिद्द, मेहनत या गुणांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल तीन हजार राख्या बनविल्या आहेत.
अहोरात्र देशाचे रक्षण करणाऱ्या या जवानांना आपला भाऊ मानणाऱ्या या गतिमंद विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी राख्या तयार केल्या आहेत. त्यांच्यासाठी या राख्या तयार करताना आनंद वाटत होता असे या मुलांनी सांगितले. रक्षाबंधन म्हणजेच राखी पोर्णिमा हा सण जवळ आला आहे. त्यानिमित्ताने रंगीबेरंगी राख्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या सर्व राख्यांमध्ये गतिमंद मुलांनी तयार केलेल्या राख्या या सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या मुलांना सर्व सामान्यांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विश्वास गतिमंद केंद्र हे गेले अनेक वर्षे विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते. त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, त्यांच्यातील कला कौशल्यांना वाट मिळावी यासाठी त्यांच्याकडून विविध वस्तू तयार करुन घेतल्या जातात. त्यातच राख्या बनविण्याचे काम गेले अनेक वर्षे सुरू असते. यंदा या २० मुला मुलींनी मिळून तब्बल तीन हजार राख्या बनविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातील ५०० राख्या या जवानांना पाठविल्या आहेत. गेल्यावर्षी त्यांनी दोन हजार राख्या बनविल्या होत्या. या मुलांबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागृती होत आहे, त्यामुळे त्यांनी बनविलेल्या राख्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने या वर्षी जादा राख्या बनविण्यात आल्याचे या केंद्राच्या मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.