पीठासीन अधिकारी नेमणुकीचे गौडबंगाल; १० दिवस उलटूनही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:25 AM2020-10-16T00:25:02+5:302020-10-16T00:25:12+5:30
केडीएमटी सभापती निवड : केडीएमसीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे परिवहन समितीमधील बलाबल पाहता या निवडणुकीत त्यांचे पारडे जड आहे
कल्याण : कोरोनामुळे लांबणीवर पडलेली परिवहन सभापतीपदाची निवडणूक जुलैमध्ये होणार होती. परंतु, ती ऐनवेळी रद्द झाली. आता पुन्हा नव्याने आदेश जारी झाल्यानंतर या निवडणुकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या नेमणुकीला १० दिवसांहून अधिक कालावधीत लोटूनही अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही.
परिवहन सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ मार्चमध्ये संपला. परंतु, कोरोनामुळे सभापतीपदाची निवडणूक होऊ शकली नाही. परिणामी, चौधरी यांना मुदतवाढ मिळाली आहे. जुलैमध्ये ही रखडलेली निवडणूक ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणार होती. त्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून तत्कालीन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची नियुक्तीही झाली होती. परंतु, जुलैअखेरीस कोकण विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आदेशाद्वारे ही निवडणूक रद्द करण्यात आली. दरम्यान, पुन्हा सभापतीपदाची निवडणूक ऑनलाइनद्वारे घेण्याबाबत नव्याने आदेश जारी झाल्याने कोकण आयुक्तांनी निवडणुकीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांची पीठासीन अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सभापतीपद निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवडय़ात जाहीर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त होते. परंतु, अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
केडीएमसीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे परिवहन समितीमधील बलाबल पाहता या निवडणुकीत त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे या पदासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजपमधील कोणाला सभापतीपदी संधी मिळते? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र, या निवडणुकीला होत असलेला विलंब आश्चर्यजनक आहे. जुलैमध्ये निवडणूक रद्द झाल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी निवडणूक घ्या, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा आक्रमक पवित्र घेतला होता. परंतु, आता निवडणुकीची तारीख जाहीर होण्यास विलंब लागत असतानाही त्यांनी बाळगलेले मौन चर्चेचा विषय ठरले आहे.
आयुक्त, सचिवांशी करणार चर्चा
यासंदर्भात भाजपचे परिवहन सदस्य संजय मोरे यांनी लवकरच सचिव आणि आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी नेमलेले पीठासीन अधिकारी गुरसळ यांनाही पत्रव्यवहार करून तारीख लवकर जाहीर करण्याची मागणी केली जाईल, असे ते म्हणाले.