गुंतवणूकदार करणार मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:36 AM2017-07-28T00:36:18+5:302017-07-28T00:36:22+5:30
मागील तीन महिन्यांपासून सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाही या कंपनीतील प्रमुख असलेल्या श्रीराम समुद्र याला अटक झालेली नाही.
बदलापूर : मागील तीन महिन्यांपासून सागर इन्व्हेस्टमेंटच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाही या कंपनीतील प्रमुख असलेल्या श्रीराम समुद्र याला अटक झालेली नाही. पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता गुुंतवणूकदार करत आहेत. त्यांनी पोलिसांना जागे करण्यासाठी बदलापूरमध्ये मानवी साखळी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन १ आॅगस्टला करण्यात येणार असल्याचे शैलेश वडनेरे यांनी सांगितले.
तीन महिन्यांपासून गुन्हा दाखल होऊनही सागर इन्व्हेस्टमेंटमधील घोटाळयाचा प्रमुख सूत्रधार श्रीराम समुद्र हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यातच तपासही संथ गतीने सुरू असल्याने गुतंवणुकदारांचा संयम सुटत चालला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून श्रीरामला अटक करावी यासाठी गुंतवणूकदार आंदोलन करणार आहेत. १ आॅगस्टला शिवाजी चौक ते बदलापूर पूर्व पोलीस ठाणे अशी मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास लकवरात लवकर करून प्रमुख आरोपीला अटक व्हावी हा एकमेव हेतू या आंदोलनामागे असल्याचे वडनेरे यांनी सांगितले. यामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर येथील गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत.
सागर इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांनी सुमारे चार हजार गुतंवणुकदारांना ४०० हून अधिक कोटीला गंडा घतला आहे. हा तपास सध्या ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. मात्र या तपासाला वेग नसल्याने तपास संथगतीने व भरकटत चालल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत. गुंतवणूकदारांनी यापूर्वीही राजकीय नेत्यांना न्याय मिळण्यासाठी साकडे घातले आहे.
संचालकांची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करा अशी मागणीही मध्यंतरी करण्यात आली होती.