गौर सजली गं, नटली गं... शाही साज लेवूनी अंगणी आली गं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 02:19 AM2017-08-29T02:19:42+5:302017-08-29T02:19:49+5:30
गणपतीपाठोपाठ ज्यांचे वेध लागतात त्या गौरी मंगळवारच्या आगमनासाठी शाही साज लेवून नटूनथटून तयार झाल्या आहेत. ठसठशीत दागिने, आकर्षक साड्या, फराळाचे पदार्थ आणि नैवेद्यासाठी भाज्या, मिष्टान्ने यांनी बाजार फुलून गेले आहेत
ठाणे : गणपतीपाठोपाठ ज्यांचे वेध लागतात त्या गौरी मंगळवारच्या आगमनासाठी शाही साज लेवून नटूनथटून तयार झाल्या आहेत. ठसठशीत दागिने, आकर्षक साड्या, फराळाचे पदार्थ आणि नैवेद्यासाठी भाज्या, मिष्टान्ने यांनी बाजार फुलून गेले आहेत. त्या खरेदीसाठी महिलांची सोमवारी दिवसभर लगबग सुरू होती.
दरवर्षी गणरायाच्या दागिन्यांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळतात. यंदा शाही साज असलेले दागिने बाजारात आहेत. त्यांना जशी पसंती मिळते आहे, तशीच पारंपरिक दागिन्यांनाही मिळते आहे. गौरीसाठी नैवेद्य म्हणून सर्वाधिक मागणी आहे ओल्या नारळाच्या करंज्यांना.
‘सोनियाच्या पावलांनी आली गौराई अंगणी...’ असे म्हणत गौराईच्या सर्वत्र थाटामाटातील स्वागताची तयारी सुरू आहे. अनेक घरात परंपरेने चालत आलेले दागिने-साड्या वापरल्या जात असल्या, तरी बºयाच कुटुंबात दरवर्षी गौराईसाठी नव्याने खरेदी केली जाते. त्यासाठी महिनाभर आधीच दागिने बाजारात आले आहेत. पण त्यांच्या खरेदीला गेल्या दोन दिवसांत वेग आला. अनेकांनी फॉर्मिंग दागिन्याचा पर्याय शोधला. पण पारंपरिक दागिने तितकेच पसंतीचे आहेत. त्यात श्रीमंतहार, राणीहार, चपलाहार, पुतळीहार, लक्ष्मीहार, मणी मंगळसुत्रांची नवी डिझाईन, ठुशी, हुडी, झुमके, कमरपट्टा, नथ, पाटली, तोडे, पीछोडी असे प्रकार आहेत. ते इमिटेशन ज्वेलरीतही पाहायला मिळतात. त्यांची किंमत २९९ रुपयांपासून ३००० रुपयांपर्यंत आहे. शिवाय तन्मणी, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, बोरमाळ, शाहीहार, मेखला, बाजूबंद यासारखे दागिने आहेत. फॅन्सी प्रकारात डायमंडचे दागिने आहेत. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा फॉर्मिंग दागिनेच घेणे भक्त पसंत करतात, असे ठाण्यातील ‘स्वर्ग’चे व्यवस्थापक सतिश गायकवाड यांनी सांगितले. बाहेरगावी जाणारे भक्त आधीच खरेदी करीत असल्याने दीड महिन्यांपासून दागिने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. स्थानिक भक्तांची मात्र शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी सुरू असल्याचे निरीक्षण गायकवाड यांनी नोंदवले.
गौरीसाठी नैवेद्य म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या उपहारगृहात उपलब्ध आहेत. करंज्याबरोबर बासुंदीचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होते. आमच्याकडून किमान ७५ किलो बासुंदीची विक्री होते असे संजय पुराणीक यांनी सांगितले. यात केशरी बासुंदीही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बेसन लाडू, जिलेबी, श्रीखंडाची देखील खरेदी होत असल्याचे त्यांनी सांगितले. गौरीसाठी मोदक आणि करंज्याच्याच आॅर्डर्स असतात. ओल्या नारळाच्या करंज्याबरोबर माव्याच्या करंज्याही उपलब्ध असल्याचे केदार जोशी यांनी सांगितले.
नऊवारी, सहावारी साड्यांत वेगवेगळी व्हरायटी आहे. यात काठ-पदराच्या साड्यांनाच जास्त मागणी असते. गौरीसाठी फार महागड्या साड्या खरेदी केल्या जात नाही. ८०० ते १२०० रुपयांपर्यंतच्या रेंजमधील साड्या खरेदी केल्या जात असल्याचे महेंद्र जैन यांनी सांगितले. समर सिल्क, कॉटन सिल्क, कोईम्बतूर, गढवाल, पैठणी, उपाडा सिल्क, साना सिल्क या पॅटर्नच्या साड्यांना खास पसंती असल्याचे जैन म्हणाले.
गौरीसाठी लागणाºया १६ भाज्याही भरपूर प्रमाणात आल्या आहेत, असे भाजी विक्रेत्या सीमा भुजबळ यांनी सांगितले. या भाज्यांचे दरही वाढले असून एका किलोमागे २० रुपये एवढी दरवाढ आहे. घेवडा, पावटा, गवार, फरसबी, भेंडी, शेवग्याची शेंग, फ्लॉवर, शिराळी, कच्ची केळी, घोसाळी, सूरण, तांबडा भोपळा, तोंडली, मटार, हिरवी काकडी यासारख्या भाज्या बाजारात विक्रीसाठी आहेत. बहुतांश विक्रेत्यांनी या १६ भाज्यांची पॅकेटच विक्रीसीठी ठेवली आहेत.
याशिवाय चकल्या, चिवडा-लाडू, करंज्या, शेव, शंकरपाळे अशा फराळाच्या पदार्थांचीही मागणी वाढली होती. गौरीपुढे सजावटीसाठी फुले, फळे यांनाही मागणी होती. फुलांमध्ये गुलाब, सोनचाफा अशा सुंघी फुलांची आणि सवजावटीसाठी परदेशी फुलांची सर्वाधिक खरेदी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
१०८ वर्षांची गौरीमाता
कोळी-ठाणेकर कुटुंबीयाची गौरीमाता म्हणून ओळखल्या जाणाºया १०८ वर्षाच्या गौरीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. यंदा ती विष्णूनगर येथील विद्याधर कोळी यांच्या घरी विराजमान होणार आहे. तिला संपूर्ण घर दाखविल्यानंतर दागिन्यांनी मढविण्यास सुरूवात केली जाणार आहे.
खास साडी आणून तिला सजविणार आहेत. १०८ वर्षांपासून परंपरेने चालत आलेले दागिने घालण्यात येणार आहेत. यात सोन्याचे फुल, गोंडे, काप, मोत्याचे डोरले, ठुशी, चपला हार, लफ्फा, लक्ष्मीहार, सिंहाच्या तोंडाचे तोडे, काटेरी तोडे, जाळीचे तोडे, पाटल्या, कंगन, चांदीची मेखला, बाजूबंद, नथ, पायातील झांजर, अंगठ्या, जोडवी यांचा समावेश आहे.