गौरी-गणपतींना दिला भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:12 AM2017-09-01T01:12:26+5:302017-09-01T01:12:36+5:30
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील
ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सुमारे १४ हजार माहेरवाशीण गौरार्इंसह गणरायाच्या ४२ हजार मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी कोसळलेल्या पावसाने गुरुवारी पूर्णपणे उसंत घेतल्याने बाप्पाची मिरवणूकही निर्विघ्नपणे काढता आली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तगणांना अक्षरश: गहिवरुन आले होते.
गेले सात दिवस मनोभावे गणरायाची विधिवत पूजा केल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात २२१ सार्वजनिकसह ४१ हजार ७५६ श्रींच्या मूर्तींना तर १३ हजार ९४७ गौरार्इंना निरोप देण्यात आला. यावेळी पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी आघाडीवर असणाºया ठाणे महानगरपालिकेने रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजीनिवाडी, बाळकूम, खारेगाव, ब्रह्मांड, गायमुख येथे विशेष कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती. तर कोपरी, पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत येथे निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन महाघाटाचा भक्तांनी उपयोग करून घेतला. तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्य कलशही उभारण्यात आले होते. वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच विसर्जन घाटांसह शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दुपारी चार वाजल्यापासूनच ठाण्यामधील सार्वजनिकसह अनेक घरगुती गणपती हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून निरोपाला निघालेले पाहायला मिळाले. विसर्जन घाटावर रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन सुरू होते.
परिमंडळ १ -५४३५ घरगुती, ५१ सार्वजनिक, १७०१ गौरींचे, परिमंडळ २ - ४३२० घरगुती, २७ सार्वजनिक, ५४५ गौरींचे, परिमंडळ ३ - १००५० घरगुती, ६४ सार्वजनिक, २७०० गौरींचे, परिमंडळ ४- १३३५५ घरगुती, ३७ सार्वजनिक, ७२३५ गौरार्इं, परिमंडळ ५- ८५९६ घरगुती, ४२ सार्वजनिक आणि १७६६ गौरींचे विसर्जन झाले.