तृतीयपंथीय गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची अत्रे कट्टयावर उलगडली कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 05:19 PM2019-10-17T17:19:18+5:302019-10-17T17:38:17+5:30
तृतीयपंथीय गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची अत्रे कट्टयावर कहाणी उलगडली.
ठाणे: तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या व एड्स बाधीत वारांगणांच्या मुलांना आधार देणाºया गौरी सावंत यांच्या अनोख्या मातृत्वाची कहाणी बुधवारी अत्रे कट्ट्यावर उलगडण्यात आली. या मुलांसाठी त्यांनी सुरू केलेले नानी का घरचा संघर्षमय प्रवास त्यांनी आपल्या औघवत्या शैलीतून उलगडला. मातृत्व हे फक्त महिलांमध्येच असते असे नाही तर ते प्रत्येकातच असते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आम्ही भीक मागत नाही तर भीक्षा मागतो. आपण शाळेत लिंग समानता शिकतो मग आम्हाला अपराधाची वागणूक समाजात का दिली जाते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुमच्याच घरात पुरूष पहिला की स्त्री पहिला यावरुन भांडण असते मग मला थर्ट जेंडर म्हटले तरी चालेल हे सांगताना त्या म्हणाल्या, नानी का घर हे भारतातील पहिले घर आहे. जिथे उतारवयातील तृतीय पंथीय आहे हे वारांगणांच्या एचआयव्ही बाधीत मुलांचा सांभाळ करतात. त्या मुलांनाही आजी आजोबांचे प्रेम मिळते आणि त्यांनाही नातवंडांचे प्रेम मिळते. आम्हाला समाजापासून तुटायचे नाही, आम्हाला समाजातच राहायचे आहे. परंतू आम्ही जसे आहोत तसेच आम्हाला स्वीकारावे इतकीच आमची अपेक्षा आहे. सरकारने ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्ड काढले तर आम्हाला घरे मिळतील आणि नोकºयाही मिळतील. माणूस म्हणून आपण प्रत्येकाचाच आदर केला पाहिजे. अंगणवाडीत तृतीयपंथीयांना नोकºया दिल्यास लहान मुलांच्या मनातली भिती तिथूनच निघून जाईल असे मत त्यांनी व्यक्त केले. माझ्या लैंगिकतेचा मला त्रास होत नाही तर तुम्हाला का होतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लैंगिकता ही बांधल्यासारखी नाही, कोणाला काय आवडेल हे सांगता येत नाही. तुम्ही तृतीयपंथीयांचा बाऊ का करतात. एका स्त्रीला पुरूषासारखे आणि पुरूषाला स्त्री सारखे वागावेसे वाटते म्हणूनच त्याला ट्रान्सजेंडर म्हणतात. यावेळी त्यांनी आर्टीकल ३७७ साठी दिलेल्या लढ्यासंदर्भात सांगितले. माझ्या सारख्या प्रत्येक गौरीला समाजाने स्वीकारावे समाज बदलला तर आम्हीही बदलू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. टाळ््या वाजवणे हा आमचा आक्रोश आहे. पोटासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागते ही शोकांतिका आहे. भीक्षा मागू नका असे आम्हाला म्हटले जाते मग पर्याय काय? असा सवाल त्यांनी विचारला. यावेळी ज्येष्ठ लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कट्ट्याच्या शीला वागळे यांनी गौरी सावंत आणि कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ. देवदत्त चंदगडकर यांचा सुरेश जांभेकर यांनी सत्कार केला. दरम्यान, चंदगडकर यांनी गौरी सावंत यांच्या नानी का घर याला अर्थसहाय्य केले. संपदा वागळे यांनी परिचय करुन दिला. सुलभा आरोसकर यांनी आभार प्रदर्शन केले.