ठाण्याच्या मराठमोळ्या गौरीने नेदरलँडमध्ये मारली बाजी, २७ तासांत तयार केले कंदील
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 2, 2020 01:18 PM2020-12-02T13:18:11+5:302020-12-02T16:48:13+5:30
ठाण्याच्या गौरीने नेदरलँड येथे कंदील बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
ठाणे : साता समुद्रापार असलेल्या युरोपमधील नेदरलँड देशात आयोजित केलेल्या कंदील बनविण्याच्या स्पर्धेत ठाण्याच्या मराठमोळ्या गौरीने बाजी मारून ठाण्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला. तब्बल २७ तासांत तिने हे कंदील बनविले. सांझी या प्राचीन कलेत हे कंदील साकारून तिने तेथे प्रथम येण्याचा मान पटकाविला.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारी गौरी पोतदार - पितळे ही सध्या नेदरलँडमध्ये राहत असून यंदाची तिची तेथील पहिलीच दिवाळी होती. दिवाळी निमित्त नेदरलँड्स ह्या देशात मराठी अस्मिता जपण्याचे काम करणाऱ्या "ऐनधोवन मराठी मंडळाने कंदील बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत तिने पहिल्यांदाच सहभाग घेऊन प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. गौरीला लहानपणापासून कलेची आवड आहे. ती उत्कृष्ट चित्रकार असून नेदरलँडमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंग, ज्वेलरी मेकिंग, डिजिटल आर्टचे फ्री लांसिंग काम करीत आहे. ठाण्यात असताना कलेशी संबंधित विविध स्पर्धांत ती भाग घेत असे. मराठी मंडळाने ही स्पर्धा ऑनलाइन घेतली होती. यंदाचे स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. यात एकूण २४ स्पर्धक सहभागी झाले होते. यात गौरीने प्रथम क्रमांक मिळविला. कंदील बनवण्यासाठी तिला एकूण २७ तास लागले. कंदील हे हस्तनिर्मित कागदावर सांझी कला (सांझी ही मथुरा आणि वृंदावनमधली कागद कोरण्याची प्राचीन कला आहे) रूपात साकारण्यात आली. तेथील स्थानिक डच लोक सुद्धा "फेस्टिवल ऑफ लाइट" नावाने दिवाळी साजरी करतात आणि जे अनिवासी भारतीय येथे आहेत ते एकत्र येऊन "तमसो मा ज्योतिर्गमय" चा संदेश एकत्र भेटून आणि आप-आपसात दिवाळीच्या शुभेच्छा देतात असे अनुभव गौरीने सांगितले. कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हता कि माझी ही कला लोकांना इतकी आवडेल. बक्षिसापेक्षा भारतीय लोक कला गुणांचा परदेशात इतके कौतुक होईल याचा आनंद जास्त आहे. अशा भावना तिने पुढे बोलताना व्यक्त केल्या. गौरीचे कौतुक पाहून तिची आई शुभांगी पितळे म्हणाल्या की, खूप आनंद होतोय. तेथील लोकांनीही तिच्यातील कलागुण ओळखले. भारतात असतानाही ती टेक्स्टाईलमध्ये महाराष्ट्रातून दुसरी आली होती.