घोडबंदरच्या सोसायटीला १५ दिवसांपासून दूषित पाणी, पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:42 AM2017-10-27T03:42:08+5:302017-10-27T03:42:12+5:30
ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मागील १५ दिवसांपासून घोडबंदर पट्ट्यातील भूमीएकर या कॉम्प्लेक्सला पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याची बाब समोर आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मागील १५ दिवसांपासून घोडबंदर पट्ट्यातील भूमीएकर या कॉम्प्लेक्सला पाइपलाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे काही नागरिकांना पोटाचे विकारदेखील झाले असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. तीन पाण्याच्या लाइनपैकी दोन पाइपलाइन बदलण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेने दिली. उरलेली एक लाइन बदलण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. लाइन जुनी तसेच गंजल्यामुळे हा प्रकार घडला असून अजूनही दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
भूमीएकर कॉम्प्लेक्समध्ये ३२० फ्लॅटधारक असून दूषित पाणी प्यायल्याने प्रत्येक मजल्यावरील एकतरी नागरिक आजारी पडला असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन राजेश गोनाडे यांनी दिली. सुरु वातीला केवळ दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. मात्र, त्यानंतर अक्षरश: गढूळ पाणी यायला लागले असल्याचे गोनाडे यांनी सांगितले. पाण्यामध्ये अळ्यादेखील आढळल्या असल्याचे त्यांनी सांगितले. वाघबीळमधून येणारी पाण्याची लाइन विजयनगरीच्या जवळ एका गटारामधून गेली आहे. ही लाइन अतिशय जुनी असल्याने ती गंजली असून गळकी झाली होती. त्यामुळे पाण्याच्या लाइनमध्ये गटाराचे पाणी मिसळल्याने हेच दूषित पाणी घरांमधील नळांमध्ये आल्याचे त्यांनी सांगितले. आता काही प्रमाणात समस्या दूर झाली असली तरी दुर्गंधीयुक्त पाणी अजूनही येत असल्याचे सोसायटीच्या चेअरमनचे म्हणणे आहे. या परिसरात ८ इंचाच्या तीन जुन्या पाइपलाइन असून त्या भूमीएकरला पाणी पुरवतात.
>पाण्याची पुन्हा तपासणी करणार
या पाइपलाइन ड्रेनेजमधून जात असल्याने सोमवारी पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली. या तीनही पाइपलाइन त्या जागेवरून काढून टाकून पूर्णपणे बदलल्या आहेत. तरीही दुर्गंधीयुक्त पाणी येत असेल, तर पुन्हा पाण्याची तपासणी करण्यात येईल.