तब्बल ८३ वर्षांनी प्रथमच रद्द झाला गावदेवी-कळवणदेवीचा यात्रा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 02:07 PM2021-04-28T14:07:20+5:302021-04-28T14:07:46+5:30
घरातूनच नमस्कार करून देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी साकडे घालण्याचे आवाहन
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : हजारो भाविकांच्या उपस्थित होणारा कळवे गावच्या गावदेवी-कळवणदेवीचा यात्रा उत्सव तब्बल ८३ वर्षांनी रद्द होणार आहे. १ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात येणारा हा उत्सव कोरोनामुळे रद्द केल्याचे आयोजकांनी सांगितले. घरातच राहून देवीला हा देश कोरोनामुक्त करण्याचे साकडे घाला असे आवाहन भाविकांना करण्यात येणार आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय विद्यमान गावदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेला आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे देवीची विधिवत पूजा केल्यानंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गेली ४५ वर्षे होत असलेले कुस्तीचे जंगी सामने देखील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहेत असे कुस्तीची पंच म्हणून गेली ३५ वर्षे जबाबदारी सांभाळणारे, गावदेवी मंदिर ट्रस्टचे संस्थापक सदस्य,माजी सरचिटणीस गोविंद पाटील यांनी सांगितले.
गेल्यावर्षी देवीचा यात्रा उत्सव कोरोनामुळे छोट्या प्रमाणात झाला होता. मैदानातच पालखी काढण्यात आली असल्याचे पाटील म्हणाले. यावर्षी रुग्णांची वाढती संख्या पाहता ट्रस्टने रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे.