‘गावगाडा-प्राचीन ते अर्वाचीन’ संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल; बी. डी. कुलकर्णी यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:21 PM2021-02-25T23:21:47+5:302021-02-25T23:22:00+5:30
बी. डी. कुलकर्णी यांचे मत
ठाणे : समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात आहे. सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरुप कुशलतेने रेखाटले असून त्याचा उपयोग निश्चितच संदर्भ ग्रंथ म्हणून होईल, अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केल्या.
कोकण इतिहास परिषद, श्रीकृपा प्रकाशन व मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित ‘गावगाडा - प्राचीन ते अर्वाचीन’ या पुस्तकाचे प्रकाशन कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले. फेसबुक लाईव्हव्दारे या पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन निवडक उपस्थितीत मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, लेखक सदाशिव टेटविलकर, कोकण इतिहास परिषदेच्या प्रवक्त्या डॉ. विद्या गाडगीळ व प्रकाशक विश्वनाथ साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी महापौर नरेश म्हस्के यांनी शुभसंदेशाव्दारे टेटविलकर समर्पित भावनेने करीत असलेल्या इतिहास संशोधन कार्याची प्रशंसा करून गावगाडा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हरवलेल्या संस्कृतीची माहिती नव्या पिढीला होईल,असा विश्वास व्यक्त केला. समतोल पद्धतीने इतिहास सांगणारे इतिहासकार म्हणून सदाशिव टेटविलकर यांची नोंद ठाण्याच्या इतिहासाला घ्यावीच लागेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे. म्हस्के, नार्वेकर, कुलकर्णी यांच्या शुभसंदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले.