ठाण्यातील संगीत कट्टयावर गीता दत्त यांच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 03:50 PM2018-10-20T15:50:37+5:302018-10-20T15:52:58+5:30
ठाणे शहरातील गायक, गीतकार, संगीतकार, वादक यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून संगीत कट्टा महत्वाचे माध्यम ठरत आहे.
ठाणे : संगीत कट्टयावर सातत्याने नवनवीन प्रयोग घडत आहेत. यावेळी संगीत कट्टयावर स्वर-साज प्रस्तुत स्व.गीता दत्त यांच्या गीतावर आधारित "कोई दूर से आवाज दे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचा हा २४ क्रं चा कट्टा होता.
संगीत कट्ट्यावर हा कार्यक्रम सादर झाला व या कार्यक्रमास प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. यात गीता दत्त यांची अजरामर गाणी ऑडिओ विजुवल द्वारे सादर करण्यात आली. गीताजींच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. एस.डी बर्मन व ओपी नय्यर यांच्या गीतांचा प्रभाव गीताजींवर होता. एस.डी बर्मन यांनी केलेले नवनवीन प्रयोग व आणि गीताजींनी त्या गाण्यांना दिलेला न्याय सादरीकरणातुन सांगण्यात आला.तसेच गीताजींनी विविध संगीतकारांसोबत गायलेली गाणी या कार्यक्रमात सादर करण्यात आली. वसंत देसाई ते हेमंत कुमार,तिमिर बरन,सलील चौधरी,कनू रॉय यांच्या सोबतची गीताजींची गाणी आज ही लक्ष्यात राहतात.तसेच गुरुदत्त आणि ओपी नय्यर यांना यशाच्या शिखरावर नेण्यात गीता दत्त यांचा फार मोलाचा वाटा होता याची आठवण कार्यक्रमाच्या निवेदिका अर्चना वैद्य यांनी करून दिली. वैद्य यांनी निवेदनाच्या माध्यमातून गीताजींचा प्रवास आपल्या समोर मांडला. कमलेश सुतवाणी यांच्यावर या कार्यक्रमाच्या संकलनाची जबाबदारी होती.त्यांनी ती उत्तमरीत्या पार पाडली.यावेळी दीपप्रज्वलन जेष्ठ प्रेक्षक माधुरी गद्रे यांनी केले. चुपकेसे मिले, मेरा नाम, दिवाना मस्ताना, मेरी जान, कोई दूर से आवाज दो हि गाणी यावेळी सादर करण्यात आली. मेरा नाम या गाण्यासाठी प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या चा कडकडाट केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही खरंच गीताजींच्या काळात रमलो. संगीत कट्ट्यामार्फत असे नवनवीन प्रयोग सातत्याने होवोत अशी भावना एका ज्येष्ठ प्रेक्षकाने व्यक्त केली.