गीता जैन यांची अपक्ष उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:32 AM2019-10-05T01:32:41+5:302019-10-05T01:32:50+5:30
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी शुक्रवारी रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी शुक्रवारी रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नगरसेवकांसह भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्तेही यावेळी जैन यांच्यासोबत होते. दुसरीकडे, भाजपचे नरेंद्र मेहता यांनीदेखील रॅली काढून स्वत:सह पत्नी सुमन व भावजय महापौर डिम्पल यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मेहतांसोबत शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. एकूण २३ उमेदवारांचे अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत आलेले आहेत.
मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून गीता जैन व नरेंद्र मेहता हे दोघेही उमेदवारी अर्ज भरणार असल्याने राजकारण्यांसह शहरवासीयांचे याकडे लक्ष लागले होते. दोघांमधील वाढता संघर्ष पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही या भागात तैनात केले गेले होते.
जैन यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय, माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना नगरसेवक राजू भोईर, त्यांच्या नगरसेविका पत्नी भावना भोईर यांनीदेखील जैन यांची भेट घेतली.
मनसेच्या वतीने हरेश सुतार, वंचित आघाडीचे सलीम खान आदींसह एकूण १७ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज सादर केले. एकूण २३ उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत.