अयोध्येत सादर होणार हिंदी भाषेतील गीतरामायण; डोंबिवलीच्या अनंतबुवा भोईर यांना मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:37 AM2018-02-11T03:37:06+5:302018-02-11T03:37:12+5:30

हभप अनंतबुवा भोईर यांच्या गीतरामायणाचे सादरीकरणाची शतकापेक्षा अधिक कार्यक्रमांची वाटचाल पूर्ण झाली असताना आता अयोध्येतील कारसेवक पुरम येथे उद्या, रविवार ११ व सोमवार १२ फेबु्रवारीला ते हिंदीतून गीतरामायण सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशातील संत महंत येणार आहेत.

Geetaramayana in Hindi language to be presented in Ayodhya; Honor of Dombivli Anantbuwa Bhoir | अयोध्येत सादर होणार हिंदी भाषेतील गीतरामायण; डोंबिवलीच्या अनंतबुवा भोईर यांना मान

अयोध्येत सादर होणार हिंदी भाषेतील गीतरामायण; डोंबिवलीच्या अनंतबुवा भोईर यांना मान

Next

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली : हभप अनंतबुवा भोईर यांच्या गीतरामायणाचे सादरीकरणाची शतकापेक्षा अधिक कार्यक्रमांची वाटचाल पूर्ण झाली असताना आता अयोध्येतील कारसेवक पुरम येथे उद्या, रविवार ११ व सोमवार १२ फेबु्रवारीला ते हिंदीतून गीतरामायण सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशातील संत महंत येणार आहेत.
श्री रामदास मिशन युनिव्हर्सल सोसायटीतर्फे १३ फेबु्रवारी ते २५ मार्चदरम्यान रामराज्य रथयात्रा काढण्यात येत आहे. त्यानिमित्ताने प्रथमच हिंदीतून गीतरामायण सादर करण्याचा मान भोईर यांना मिळाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी मराठीतून पाचशे लोकांसह गीतरामायण सादर केले होते. त्या वेळी रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत जन्मेजय शरणजी यांनी हिंदीतून गीतरामायण सादर करण्याची सूचना केली होती.
मूळ लेखक गदिमा यांच्या गीत रामायणाचे हिंदीत भाषांतर पं. रूद्रदत्त मिश्र यांनी केले आहे. त्याची प्रत बाळ करंदीकर आणि सुभाष कुलकर्णी यांच्या मदतीने त्यांनी मिळवली. गीतरामायणात संगीताच्या दृष्टीने काही शब्द कठीण होते. पं. आलोक भट्टाचार्य यांनी ते शब्द बदलून त्यांची योग्य बांधणी केली. या रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे नृत्यविष्काराचे कोरिओग्राफर केरळच्या श्रीजा वारियर, शब्दरचना पुनर्लेखन करणारे आलोक भट्टाचार्य हे बंगालचे, अनुवादक रूद्रदत्त मिश्र हे उत्तर प्रदेशचे तर गायक-वादक महाराष्ट्रातील आहेत.
निळजे घेसर येथील रहिवासी असलेले अनंतबुवा केडीएमसीत नोकरीला आहेत. बुवा म्हणूनच ते सर्वत्र परिचित आहेत. गेली ३५ वर्षे ते गात आहेत. वारकरी सांप्रदायातील सावळाराम म्हात्रे महाराज यांचा त्यांना लहानपणापासून सहवास लाभला. त्यांच्याबरोबर ते कीर्तन करीत होते. सावळाराम महाराजांसोबत भोईर हे एकदा तुंगारेश्वर डोंगरावरील सदानंद महाराजांच्या आश्रमातील राम मंदिरात कीर्तन करत होते. त्यावेळी बाबुजींनी त्यांना बोलवून तू गीतरामायण गाऊ शकशील, असे सांगितले. सावळाराम महाराजांनीही त्यांना गीतरामायण सादर करण्यास सांगितले. बुवांनी पं. एस. के. अभ्यंकर व मधुकर जोशी यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. बुवा यांचे वडील काशिनाथ भोईर हे शहीर होते. त्यांचा कलेचा वारसा बुवा समर्थपणे पेलत आहेत.
भालचंद्र पेंढरकर यांच्यामुळे ते संगीत नाटकांकडे वळले. संगीत नाटकात काम करणारे आगरी समाजातील ते पहिलेच कलाकार ठरले आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचा परिचय व्हावा, या हेतूने ते सावळाराम महाराज संगीत कला अकादमी आणि स्व. प्रल्हाद शिंदे संगीत अकादमीद्वारे विनामूल्य शिक्षण देत आहेत.

केरळमध्येही होणार कार्यक्रम
अयोध्येनंतर २४ मार्चला केरळमधील तिरुवनंतपुरम येथील पद्मनाभ मंदिरात रामकंद परिक्रमेतील राम राज्य संमेलनात २१ ते २४ मार्च दरम्यान बुवांचे गीतरामायण होणार आहे. श्रीलंकेच्या अशोक वाटिकेत रामकथा सादर करण्याचा मानस बुवांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Geetaramayana in Hindi language to be presented in Ayodhya; Honor of Dombivli Anantbuwa Bhoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे