भिवंडीतील पडघ्याजवळ जिलेटीनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू, पोलीस तपास सुरू
By नितीन पंडित | Published: May 4, 2023 01:36 PM2023-05-04T13:36:57+5:302023-05-04T13:37:21+5:30
घातपात की अपघात याबाबत पोलिसांचा शोध सुरू
भिवंडी: भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कांदळी गावाजवळ जिलेटिनच्या स्फोटात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात नसून आपल्या मुलासोबत घातपात झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर दुसरीकडे हा प्रकार नेमका घडला कसा याचा तपास पडघा पोलीस करीत आहे.
भिवंडी तालुक्यातील कांदळी गावाजवळ हायवेच्या शेजारीच असलेल्या एका शेतात बुधवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाचा शोध घेतला असता हा तरुण वाशिंद येथील दहा गावातील रहिवासी असून त्याचे नाव कल्पेश भाऊ देसले आहे. कल्पेश हे या परिसरामध्ये वेल्डिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र बुधवारी त्याचा मृतदेह हा ज्या अवस्थेत सापडला त्यावरून पोलिसांनी हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात घेऊन तात्काळ ठाण्याच्या बॉम्बशतक पदकाला आणि श्वान पथकाला पाचारण केले. कल्पेश याचे शक्तिशाली स्फोटकांमुळे मृत्यू ओढवण्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
मंगळवारी मध्यरात्री कल्पेश हा दहागाव मधील एका हळदी समारंभात असताना त्याला अचानक फोन आल्याने तो घाई घाईतच हळदी समारंभातून बाहेर पडला होता. गावाबाहेर एका मित्राला बोलावून त्याच्याकडून काही पैसे उसने घेत तो पुढे निघून गेला घरच्यांनी त्याच्याशी संपर्क साधला असता आपण हळदी समारंभात असल्याचे कारण त्यांनी दिले. मात्र रात्रीच्या अंधारात कल्पेश याचा स्फोटकाच्या धमाकात मृत्यू ओढावला. कल्पेशाचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी आता याप्रकरणी तपासाची सूत्रे फिरवली असून नेमका हा प्रकार घात आहे की अपघात आहे याची चाचणी सुरू केली आहे.
कुटुंबीयांनी केला घातपाताचा आरोप
कांदळी गावाजवळ कल्पेश याला एका माळ रानात लोखंडी पत्रे बसवून देण्याचे काम मिळाले होते. त्या कामावरून काही स्थानिकांबरोबर त्याचे किरकोळ वाद देखील झाले होते. तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून कल्पेश हा काही तणावातच वावरत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कल्पेश सोबत अपघात घडला नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
कल्पेशला आलेल्या कॉलच्या आधारे तपास:
कल्पेश याला रात्री साडेअकरा वाजताच्या दरम्यान जो कॉल आला होता. त्या कॉलचा तपास पोलीस करीत आहेत. तसेच एवढ्या रात्री कल्पेश माळ रानात एकटाच गेला होता की त्याच्यासोबत इतर कोणी होते, याचा देखील पोलीस तपास घेत आहेत.