भाजपच्या ठिय्या आंदोलनानंतरही महासभा सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:33 AM2020-11-21T01:33:22+5:302020-11-21T01:33:29+5:30
गोंधळात झाले विषय मंजूर : सदस्यांचा सभात्याग, महासभा रद्द करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वेबिनारद्वारे होणारी महासभा रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठिय्या आंदोलन केले. परंतु, तरीदेखील महासभा सुरूच राहिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कृतीचा निषेध करून चुकीचे विषय मंजूर करण्यासाठीच ही वेबिनार महासभा घेतल्याचा आरोप केला. या संदर्भात प्रशासनाने वेबिनार महासभा का घेतली जात आहे, याचा खुलासाही केला. परंतु, तरीही भाजपच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अखेर महासभा सुरूच राहिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.
शुक्रवारच्या महासभेत दुस-या टप्प्यातील क्लस्टर योजनेच्या सहा आराखड्यांना मंजुरी देणे, चुकीच्या पद्धतीने मेट्रोच्या ठेकेदाराला विनामोबदला जागा वापरण्यासाठी देणे, सायकलस्टॅण्डचा जाहिरातीसाठीचा चुकीच्या पद्धतीने आणलेला प्रस्ताव असे काही प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर होते. या विषयांसह इतर विषयांवर चर्चा व्हावी, या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना पत्र देऊन ही सभा रद्द करून प्रत्यक्ष सभा घ्यावी, अशी मागणी केली. परंतु, तरीदेखील शुक्रवारी महासभा सुरू झाली. त्यामुळे वेबिनार महासभा रद्द करून प्रत्यक्ष घेण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी बल्लाळ सभागृहात ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी भाजपने जी मागणी केली आहे, तीच मागणी राष्ट्रवादीनेदेखील केली असून, महासभा प्रत्यक्ष स्वरूपात का घेतली जात नाही, याचे उत्तर प्रशासनाकडे मागितले. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनीही महासभा प्रत्यक्ष व्हावी, यासाठी प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार आता नेमकी काय परिस्थिती आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असे आदेश त्यांनी दिले.
राज्य सरकारकडे केला पत्रव्यवहार
प्रशासनाच्या वतीने सचिव अशोक बुरपुल्ले यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्यापही उत्तर न आल्याने ही सभा वेबिनारद्वारे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या या उत्तरानंतरही भाजपच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही.