कल्याण स्थानकातील बकालपणामुळे महाव्यवस्थापक नाराज; आठ दिवसात परिस्थिती सुधारण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 02:45 PM2018-09-01T14:45:40+5:302018-09-01T14:48:45+5:30
स्थानकात सुधारणा करुन आठ दिवस फोटो पाठवण्याच्या सूचना
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: कल्याणरेल्वे स्थानकातील बकाली पाहून मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक डी. के. शर्मा यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. लांब पल्ल्यासह उपनगरीय लोकल गाड्यांचे जंक्शन असलेल्या स्थानकात एवढी बकाली का?, असा सवाल करत त्यांनी स्थानक प्रशासनासह सफाई अधिकारी आणि विभागीय व्यवस्थापकांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. टिटवाळा स्थानकात रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या रिक्षांना तातडीने मज्जाव करावा, त्या ठिकाणी तात्काळ बॅरिकेड्स लावावेत असे आदेश त्यांनी दिले.
मध्य रेल्वेच्या कल्याण टिटवाळा सेक्शनच्या महाव्यवस्थापकांनी शनिवारी पाहणी दौरा केला. सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा इन्स्पेक्शन ट्रेनने कल्याण स्थानकात आला. स्थानकात आल्यावर त्यांनी पादचारी पूल, वॉटर व्हेंडींग मशिन, तिकिट घर यासह फलाटांची पाहणी करत प्रचंड नाराजी व्यक्त केली. स्थानकातील विविध फलाटांमध्ये असलेली बकाली, दुर्गंधी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत स्वच्छता राखा, वरवर, दिखाव्यासाठी कामे करू नका असे सांगत स्थानक प्रशासन, स्वच्छता अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
पादचारी पूलापासून जेथे स्काय वॉक आहेत, त्या भागामधून फेरीवाल्यांना हटवा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. वॉटर व्हेंडींग मशिनजवळ साचलेल्या पाण्याबद्दलही महाव्यस्थापक डी. के. शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याजवळ जर एवढी बकाली असेल, तर मग प्रवाशांना चांगले पाणी देण्याची जबाबदारी कोणाची? केवळ आम्ही येणार म्हणून स्वच्छता राखू नका, कायमच स्वच्छता ठेवा. स्वच्छतेसह ज्या सूचना दिल्या त्याबाबत काय सुधारणा केल्या त्याचे दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंतचे विविध वेळांमध्ये काढलेले फोटो पाठवा असे आदेश त्यांनी विभागीय व्यवस्थापक जैन यांना दिले.
कल्याण स्थानकाची पाहणी केल्यानंतर शर्मा यांनी शहाड, आंबिवली स्थानकांसह मार्गाचा पाहणी दौरा केला. त्या पाहणीत त्यांनी काही सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या. त्यानंतर सकाळी ९ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास ते टिटवाळा स्थानकात आले. तेथे आल्यावर त्यांनी कल्याण दिशेकडील पादचारी पूलाचे काम जलद करावे, तसेच मधला पूल आहे त्याची काही ठिकाणी डागडुजी आहे, तीदेखील करण्यात यावी असे म्हटले. त्याच दरम्यान आलेल्या एका लोकलमुळे मधला पादचारी पूलावर झालेली गर्दी, कोंडी त्यांनीही अनुभवली. ते म्हणाले की, काही काळानंतर त्या पूलाची रूंदी वाढवण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात यावा, पूलावर हवा खेळती राहण्यासाठी विशेष सुविधा कराव्यात असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी टिटवाळा स्थानकाच्या पूर्वेला येत तिकिट घराच्या ठिकाणी पाहणी केली. तेथेही संरक्षक भिंत बांधून घ्यावी आणि जेथून शॉर्टकट आहेत ते सगळे बंद करावेत अशा सूचना दिल्या. पश्चिमेलाही संरक्षक भिंत बांधावी जेणेकरून कोणीही रूळ ओलांडणार नाही आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी उपाययोजना करावी असे सूचित केले. तसेच कसारा एन्डलाही पादचारी पूलाचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले.