मीरा भाईंदर महापालिकेची महासभा ऑनलाईन होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 03:40 PM2020-08-07T15:40:58+5:302020-08-07T15:41:04+5:30

खर्चाच्या गोष्टी ठरवताना त्यात अत्यावश्यक कामांचा आणि लोकांना उपयुक्त ठरेल अश्या कामांचा समावेश असायला हवा .

The general meeting of Mira Bhayander Municipal Corporation will be online | मीरा भाईंदर महापालिकेची महासभा ऑनलाईन होणार 

मीरा भाईंदर महापालिकेची महासभा ऑनलाईन होणार 

googlenewsNext

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे अंदाजपत्रक आपल्या म्हणण्या प्रमाणे मंजूर करण्यासाठी धडपडत असलेल्या राजकारण्यांनी आता ऑनलाईन महासभा घेण्याचा निर्णय घेतला आहे . येत्या 13 ऑगस्ट रोजी ऑनलाईन महासभा घेण्यात येणार असून त्या मध्ये सन 2019 - 20 चे सुधारित आणि सन 2020 - 2021 चे मूळ अंदाजपत्रक मंजूर करण्याचा विषय घेण्यात आला आहे. 

अंदाजपत्रक हे मूळ महसुली उत्पन्न विचारात घेऊन केले गेले पाहिजे. खर्चाच्या गोष्टी ठरवताना त्यात अत्यावश्यक कामांचा आणि लोकांना उपयुक्त ठरेल अश्या कामांचा समावेश असायला हवा . पालिकेची आर्थिक स्थिती पाहून काटकसर केली जाणे अपेक्षित असते . परंतु मीरा भाईंदर मध्ये मात्र सत्ताधारी - विरोधातील नगरसेवक आणि प्रशासन देखील या सर्व गोष्टीं कडे सोयीस्कर डोळेझाक करत आले आहेत . सत्ताधारी तर बहुमताच्या बळावर स्वतःच्या मनमर्जी नुसार आणि आपले नगरसेवक आहेत त्या भागातील कामांना झुकते माप देतात. 

कोरोनाच्या संसर्ग मुळे महासभा झालेली नसली तरी आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर पालिकेचे कामकाज चालू शकते . परंतु सत्ताधारी भाजपाला मात्र स्वतःच्या भूमिकेनुसार अंदाजपत्रक मंजूर करायचे असल्याने त्यांची महासभेसाठी धडपड सुरु होती . या आधी इंद्रलोक येथील प्रमोद महाजन सभागृहात महासभेचे आयोजन केले गेले होते . पण टीका होताच ती महासभा रद्द करण्यात आली होती. 

आता पुन्हा महापौरांच्या आदेशाने सचिवांनी 13 ऑगस्ट रोजी अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी महासभा आयोजित केली आहे . सदर महासभा ऑनलाईन होणार असून त्यासाठी सर्व नगरसेवक , अधिकारी यांना झूम एप डाऊनलोड करण्यास सांगितले आहे . या ऑनलाईन महासभेसाठी ईमेल व मोबाईलवर लिंक पाठवली जाणार आहे . सभेची वेळ सकाळी साडे अकराची असली तरी सर्वाना 11 वाजताच ऑनलाईन जॉईन होण्यास सांगितले आहे . नगरसेवकांना बोलायचे असेल तर राईझ हॅन्ड हे क्लिक करून महापौरांची परवानगी घ्यायची आहे.

Web Title: The general meeting of Mira Bhayander Municipal Corporation will be online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.