त्याग आणि मूल्यांच्या भाषेला तरुणांची पिढी कंटाळली

By admin | Published: May 23, 2017 01:41 AM2017-05-23T01:41:39+5:302017-05-23T01:41:39+5:30

आपण आजच्या तरुण पिढीला खूप मूल्ये देतो, असे आधीच्या पिढीला वाटते. पण त्या पिढीच्या त्यागाच्या आणि मूल्यांच्या भाषेला आताची पिढी कंटाळली आहे.

The generation of renunciation and values ​​bothered the generation of young people | त्याग आणि मूल्यांच्या भाषेला तरुणांची पिढी कंटाळली

त्याग आणि मूल्यांच्या भाषेला तरुणांची पिढी कंटाळली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपण आजच्या तरुण पिढीला खूप मूल्ये देतो, असे आधीच्या पिढीला वाटते. पण त्या पिढीच्या त्यागाच्या आणि मूल्यांच्या भाषेला आताची पिढी कंटाळली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संवादाची भाषा व मुद्दे बदलणे आवश्यक आहे, असे परखड मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केले.
‘वुई नीड यू सोसायटी’तर्फे शनिवारी पेशवे सभागृहात ‘वसा, वारसा आणि भरवसा’ हा कार्यक्रम झाला. त्यात डॉ. नाडकर्णी, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन, नगर येथे स्नेहालय संस्था उभारणारे, समाजात नाईलाजाने व परंपरेने शरीरविक्र य कराव्या लागणाऱ्या महिलांच्या मुली-मुलांना तसेच वंचीत समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे डॉ. गिरीश कुलकर्णी या मान्यवरांचा प्रवास सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उन्मेष बागवे व पत्रकार अलका धूपकर यांनी अनेक प्रश्नांच्या माध्यमातून उलगडला. तिन्ही मान्यवरांनी अनेक उदाहरणे देत आपल्या कार्याचा विस्तृत प्रवास श्रोत्यांसमोर उलगडला. त्यांच्या आयुष्यात आलेला संघर्ष आणि त्या संघर्षाचा जिद्दीने केलेला सामना हे सांगणारे अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. काही प्रसंगांनी श्रोत्यांच्या अंगावर अक्षरश: काटे आले.
सोशल मीडियाला आपण दोष का द्यायचा? त्याचे चांगले परिणामही दिसून येत आहे. शेवटी ते माध्यम आहे. ते कसे हाताळावे, हे आपल्या हातात आहे, अशी भूमिका नाडकर्णी यांनी घेतली. तरुणांचे पुढचे नेतृत्व हे महानगरापेक्षा छोट्या गावांतून आलेले असेल. आज आयपीएलमधील उगवते तारेही महानगरातील नाहीत. त्यामुळेच महानगरांत-मोठ्या शहरांत राहणाऱ्या तरुणांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यांचा संघर्ष हा त्यांची जीवनशैली आणि चंगळवादाचा आहे. त्याला ही मुले कसे तोंड देणार? त्याबबात त्यांना वेळीच मार्गदर्शन केले नाही, तर पुढच्या काळात या मुलांचा आंतरिक संघर्ष उभा राहील. महापरिवर्तनाच्या विचारांची नव्याने मांडणी आणि कार्यकर्त्यांची साखळी उभी केली नाही; तर या मुलांचा संघर्ष वाढत जाईल. म्हणूनच तरुण पिढीवर शिक्के मारावे, असे मला वाटत नाही. त्यांना दोष देणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. उलट त्यांची मानसिक आणि भावनिक शक्ती वाढविण्याचे काम केले पाहिजे, असा आग्रहही त्यांनी धरला.
विचार हा मला संस्थेपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो. विचारांचा वारसा पोहोचविण्याचे काम हे आव्हान आहे. तेते विचार पुढे जाण्याची स्ट्रॅटेजी त्यात्या संस्थेने स्वीकारणे महत्त्वाचे आहे. संस्था आणि विचार हे वेगळे होऊ नयेत. वारसा हा संस्थेपुरता किंवा ज्ञानशाखेपुरता मर्यादित राहू नये, अशी मांडणी नाडकणी यांनी केली. विरंगुळा कशात शोधता असे विचारता विरंगुळ््याचे क्षण पैशानेच येतात, असे नाही; तर बिनपैशाचे विरंगुळेही खूप श्रीमंत असतात, असे त्यांनी सांगितले.
उल्का महाजन म्हणाल्या की, माझी लढाई योग्य दिशेने सुरू आहे. माझी इतरांच्या जगण्यावरही श्रद्धा आहे. माझ्या ज्येष्ठांना मी कधी निराश पाहिले नाही. आपल्या कामाचा पल्ला व मर्यादा माहित असेल, तर निराश होता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला. आमचे काम संघटनात्मक म्हणजेच संवादाचे आहे. आता आमची मोठी फळी आहे. दुर्दैवाने लोकसंघटना आपल्या समाजात नाही. सेवेचे आकर्षण सर्वांनाच आहे. परंतु त्यात संघर्षाला स्थान नाही. संघर्ष करणाऱ्यांना विकासविरोधक ठरविले जाते. त्यामुळे संविधानातील किमान मूल्यांशी प्रामाणिक राहून आपापल्या क्षेत्रात काम करा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. निमशहरी भागातून येणाऱ्यांकडून खूप आशा आहे. हे तरुण नक्की समाजाला पुढे नेतील. जुन्या पिढीने आजच्या तरुण पिढीवर आरोप करु नयेत, असेही त्या म्हणाल्या. रचनेचे काम संघर्ष करुन टिकवावे लागते. रचनेकडून संघर्षाकडे आणि आता रचनेबरोबर संघर्ष असे आमचे काम सुरू आहे. नवीन पिढीला समजून घेण्यास मागची पिढी कमी पडतेय. ‘स्नेहालय’ चालविताना त्यामागची प्रेरणा महत्त्वाची वाटत असल्याचे महाजन म्हणाल्या.

Web Title: The generation of renunciation and values ​​bothered the generation of young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.