पडघ्यातून ६० टन अवैध लाकूडसाठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:58 AM2018-03-27T00:58:07+5:302018-03-27T00:58:07+5:30

भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या वनक्षेत्रामध्ये वनविभागाने शनिवारी धडक मोहीम राबवली.

Get 60 tons of illegal wood stock from the fall | पडघ्यातून ६० टन अवैध लाकूडसाठा हस्तगत

पडघ्यातून ६० टन अवैध लाकूडसाठा हस्तगत

Next

ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या वनक्षेत्रामध्ये वनविभागाने शनिवारी धडक मोहीम राबवली. १२ तास अखंड शोधमोहीम राबवून वनविभागाने जवळपास ६० लाकडांचा अवैध साठा हस्तगत केला. येथे अवैधरीत्या सुरू असलेली एक आरा मशीनही वनअधिकाऱ्यांनी हस्तगत केली.
पडघा परिसरात काही लाकूडमाफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आदिवासी लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडून लाकडाची अवैध कत्तल करून घेतात. त्यासाठी वनपरिसरातील गावागावांत लाकूडमाफियांचे हस्तक कार्यरत आहेत. आदिवासींनी आणलेले खैर आणि सागवान जातीचे लाकूड हे माफिया ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भावाने विकत घेतात. लाकडाचा आवश्यक तेवढा साठा झाला की, त्याची अवैध वाहतूक केली जाते. चोरीचे हे लाकूड मुख्यत्वे चिपळूणकडे पाठवले जाते. चिपळूणला काथाच्या अवैध भट्ट्या मोठ्या प्रमाणात आहेत. काथ बनवण्यासाठी खैर जातीचे लाकूड वापरले जाते. आदिवासींकडून कवडीमोल घेतलेले लाकूड त्यांना दामदुप्पट विकले जाते.
झाडांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात माया गोळा करणाºया या लाकूडमाफियांवर वनविभागाने शनिवारी जोरदार कारवाई केली. वनअधिकारी आणि कर्मचाºयांच्या ताफ्याने पडघ्यातील राहूर आणि बोरिवली गावात शनिवारी सकाळी ६ वाजता धडक दिली. आदिवासींकडून घेतलेल्या लाकडाचा साठा हस्तगत करण्यासाठी वनकर्मचाºयांनी दोन्ही गावे पिंजून काढली. दोन्ही गावांमधून जवळपास ३० टन सागवान आणि तेवढेच खैर जातीचे लाकूड यावेळी हस्तगत करण्यात आले. लाकडाच्या अवैध वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहनेही यावेळी हस्तगत करण्यात आली. राहूर येथे शोधमोहीम सुरू असताना वनअधिकाºयांना एका घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये अनधिकृतरीत्या आरा मशीन सुरू असल्याचे निदर्शनास आले. ही संपूर्ण मशीन उचकटून जप्त केली असल्याची माहिती वनअधिकाºयांनी दिली. या कारवाईमध्ये ठाण्याचे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, विभागीय वनअधिकारी सचिन कंद, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, दिलीप देशमुख, शांताराम वार्इंदे, वनपाल अर्जुन निचिते यांच्यासह इतर वनअधिकारी, वनपाल आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही मोहीम रात्री ८ च्या सुमारास सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आली. मात्र, मोहीम संपली नसून कारवाई सुरूच राहणार असल्याचे वनअधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Get 60 tons of illegal wood stock from the fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.