पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचत जावे!

By admin | Published: May 7, 2017 05:50 AM2017-05-07T05:50:21+5:302017-05-07T05:50:21+5:30

पुस्तकवाचनाची आवड जपणाऱ्यांनी आपल्याकडील दोन, तीन, चार तर अगदी ५० पुस्तके देऊन ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमाला

Get a book, give a book, should be read continuously! | पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचत जावे!

पुस्तक घ्यावे, पुस्तक द्यावे, अखंड वाचत जावे!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पुस्तकवाचनाची आवड जपणाऱ्यांनी आपल्याकडील दोन, तीन, चार तर अगदी ५० पुस्तके देऊन ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमाला साथ दिली.
ठाण्यातील वाचक शनिवारी भरभरून पुस्तके आणत होते अन् आवडलेले पुस्तक अगदी आवडीने नेत होते. ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे!, अखंड वाचत जावे’ या संकल्पनेवर आधारित पुस्तकाच्या देवाणघेवाणीचा आगळावेगळा उपक्रम ठाण्यात राबवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण या उपक्रमाचा लाभ घेत आहेत.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचनचळवळीचा विस्तार भारतभर तर झालाच आहे, पण भारताव्यतिरिक्त जगाच्या विविध देशांतही दर्जेदार मराठी ग्रंथ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने केले आहे. सर्वदूर पसरलेल्या या चळवळीशी ३५ हजार वाचक जोडले गेले, तर एक कोटी ७५ लाखांची सव्वालाख पुस्तके या चळवळीत प्राप्त झाली. वाचनालयापासून दूर गेलेल्या वाचकाला पुस्तकाच्या जवळ आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ हा उपक्रम.
प्रत्येक वाचकाकडे किमान पाच ते सहा पुस्तके असतातच. ती वाचून झाल्यावर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशा वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून रानडे यांनी पुस्तकांच्या देवाणघेवाणीचा उपक्रम सुरू केला. वाचकांनी त्यांच्याकडील वाचून झालेली पुस्तके दुसऱ्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती पुस्तके देण्याची संकल्पना मांडली. नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू केल्यानंतर शनिवारी ठाण्यात त्याचा शुभारंभ झाला.
रविवारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत तळ मजला, ब्लॉक नंबर ३, बिल्डिंग नंबर १, घंटाळी सहनिवास, घंटाळी मंदिरमागे, नौपाडा, ठाणे (प.) येथे हा उपक्रम सुरू राहणार आहे.
ठाणेकरांना या उपक्रमाची माहिती मिळताच सोसायटीच्या आवारात अर्धा तास आधीच ते उपस्थित राहिले होते. अनेकांनी आपल्याजवळची पुस्तके देऊन आपल्याला आवडलेली पुस्तके नेत होते. कोणी कथा, कादंबऱ्या, कोणी धार्मिक, तर काही जण अ‍ॅडव्हेंचर पुस्तके नेत होते. यात केवळ ज्येष्ठांचा नव्हे, तर अगदी शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग दिसून आला. ही संकल्पना सर्वांनाच आवडल्याचे भाव ठाणेकर वाचकांच्या चेहऱ्यावर होते. कोणी गाडीतून, कोणी रिक्षातून आपली पुस्तके पिशव्या भरून आणत होते. पुस्तकाच्या देवाणघेवाणीसाठी घंटाळी सहनिवासात भली मोठी रांग लागली होती. या उपक्रमात ८०० पुस्तके मांडण्यात आली होती. तसेच, नवीन पुस्तकांचादेखील यात समावेश होता. या नवीन पुस्तकांसाठी यामिनी पानगावकर, मिलिंद जोशी, रवींद्र अमृतकर, शुभांगी दातार यांचे अर्थसाहाय्य लाभल्याचे रानडे यांनी सांगितले.
ठाण्यानंतर मुलुंडमध्ये २७ व २८ मे रोजी हा उपक्रम राबवला जाईल. त्यानंतर, जिथे बोलवतील तिथे पुस्तकांचा रथ घेऊन जाऊ, असेही ते म्हणाले. पुस्तकांच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून वाचनाचे प्रमाण अधिक वाढते. हे प्रमाण वाढावे, यासाठी संस्थेचा हा प्रयत्न आहे.

दर्जेदार पुस्तके या उपक्रमात उपलब्ध करून दिली आहेत. वाचकांनी त्यांना आवडलेले पुस्तक मोफत घेऊन जावे. तसेच आपल्याला वेगळे पुस्तकवाचनाचा मिळणारा आनंद सर्वांना मिळावा, म्हणून आपल्याजवळील एक पुस्तक देऊन जावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. अनेक वाचकांच्या घरी वाचून झालेल्या पुस्तकांना नवीन वाचक मिळतील आणि स्वत:ही ग्रंथसंपन्न व्हाल, असेच या उपक्रमातून सांगण्याचा प्रयत्न आहे.
- विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान

माझ्या घरातील मी ३७ पुस्तके या उपक्रमात दिली. मला आवडलेली मी दोन ते तीन पुस्तके घेतली. ही कल्पना खूप चांगली आहे. - मधुरा वैशंपायन, विद्यार्थिनी
ग्रंथवाचन आणि त्यांच्या प्रसारासाठी झपाटलेल्या माणसाने सर्वांना झपाटून टाकले. या उपक्रमात मी चार पुस्तके दिली असून दोन पुस्तके घेऊन जाणार आहे. -भा.वा. दाते, वाचक
विनायक रानडे यांचे उपक्रम उत्तम आहेत. ज्या वेळी नाशिकमध्ये हा उपक्रम राबवला, तेव्हा त्यांना ठाण्यातही हा उपक्रम राबवण्यास सांगितले. आज या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळाला.
- यामिनी पानगावकर, सदस्य,
ग्रंथ तुमच्या दारी

Web Title: Get a book, give a book, should be read continuously!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.