पुरेशी झोप घेऊनच वाहन चालवा - मकरंद अनासपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:00 AM2020-01-16T01:00:54+5:302020-01-16T01:01:58+5:30
रस्ता सुरक्षा अभियान : वाहनचालकांना केले मार्गदर्शन; ठाण्यात टेम्पोचालकांसाठी सुरक्षा अभियानाचा कार्यक्रम
ठाणे : चालकांनी पुरेशी झोप घेऊनच वाहने चालवावी. वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांवर नियंत्रण येईल, असा विश्वास सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ठाण्यातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी व्यक्त केला.
मुख्य टपाल कार्यालयाजवळील सिद्धी सभागृहात ठाण्यातील ट्रक तसेच टेम्पोचालकांसाठी रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मालाची वाहतूक करताना प्रमाणापेक्षा जास्त मालाची वाहतूक करूनका. त्यामुळेही अपघाताला आमंत्रण दिले जाते.
मर्यादित वेग ठेवून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास निश्चितपणे अपघात होणार नाहीत. तसेच वाहतूक नियम न पाळता पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालणाऱ्या वाहनचालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे. पोलीस हे वाहतुकीच्या नियमांचा आग्रह धरून कारवाई करतात. या चांगल्या कारवाईला वाहनचालकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. तर, अभिनेते मोहन जोशी म्हणाले, आपलीही ट्रान्सपोर्ट कंपनी होती. वाहतूक नियमांचे चांगल्या प्रकारे पालन केल्यामुळेच कधीही अपघाताचा प्रसंग उद्भवला नाही. रात्रीच्या वेळी वाहन चालविताना वाहनांना रेडियम लावा. सीटबेल्ट लावा. खड्डे पाहूनच मागील वाहनांकडेही लक्ष द्या, असे अनेक सल्ले देऊन त्यांनी वाहनचालकांचे उद्बोधन केले.
यावेळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनीही गेल्या वर्षभरात अपघातांची टक्केवारी कमी करण्यात वाहतूक शाखेला यश आल्याचे सांगितले. ही टक्केवारी आणखी कमी करण्यासाठी सर्वच चालकांचे पोलिसांना सहकार्य अपेक्षित असून कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यप्राशन करून कोणीही वाहन चालविणार नाही, याची खबरदारी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. ठाणे जिल्हा वाहतूक संघटनेचे विजय यादव, प्रकाश देशमुख आणि पैठणकर आदी पदाधिकारी तसेच ३०० ते ४०० वाहनचालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते.