कुपोषणाचा आता शहरांनाही विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:55+5:302021-07-05T04:24:55+5:30

नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कुपोषण म्हटले की मेळघाट, नंदुरबारसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडसारखे तालुके ...

Get rid of malnutrition in cities now | कुपोषणाचा आता शहरांनाही विळखा

कुपोषणाचा आता शहरांनाही विळखा

Next

नारायण जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कुपोषण म्हटले की मेळघाट, नंदुरबारसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडसारखे तालुके आठवतात; मात्र मुंबई, ठाणे, पुणेसारख्या शहरांतील मुलांमध्येही आता कुपोषण वाढत असल्याचे अनेक सामाजिक संस्थांनी केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे लठ्ठ मुलांमध्येही ते आढळले आहे. यामुळे लठ्ठ मुलांची शारीरिक तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

महानगरात आढळणाऱ्या कुपोषणाचे ढोबळ मानाने दोन भाग पाडता येतील. एक म्हणजे झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये होणारे कुपोषण आण‌ि उच्च मध्यमवर्गीय-उच्चभ्रू वर्गात होणारे कुपोषण.

झोपडपट्टी-वस्त्यांमध्ये होणाऱ्या कुपोषणाच्या कारणांमध्ये तुटपुंजे उत्पन्न आणि महागाईमुळे या ठिकाणी संतुलित आहार मिळणे अवघड असते. अशिक्षितपणाही यात भर टाकीत आला आहे. सकाळी या मुलांचे पालक त्यांना बिस्किटे, कुरकुरे, वेफर्स सारखे पदार्थ खायला देतात. ठाणे, मुंबईतल्या अनेक अभ्यासांत, शहरातील विविध वस्त्यांत कुपोषित बालके आढळली आहेत. महत्त्वाचे म्हणजे अनेकदा आईकडून मुलांमध्ये कुपोषण येते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने अनिमियाग्रस्त आईकडून अनेक मुले जन्मत:च कुपोषित जन्माला येतात.

यावर केवळ पोषक आहाराचा पुरवठा हाच एकमेव उपाय असून विविध युनिसेफ, अपनालय, टाटा सामाजिक संस्थांसारख्या अनेक संस्था या कामात सक्रिय झाल्या आहेत. या शासनाच्या अमृत पोषण आहाराचाही मोठा वाटा आहे. याशिवाय अनेक सामाजिक संस्था सर्व प्रोटिन्स असलेल्या पावडरची पाकिटे मातांना वाटून कुपोषण कमी करण्यास मदत करीत आहेत.

शहरी भागात कुपोषण वाढण्यामागे उच्च मध्यमवर्गीय-उच्चभ्रू वर्गातील बहुतेक कुटुंबे ही विभक्त कुटुंबे आहेत. त्यामुळे या वर्गातील मुलांना एक तर पाळणाघर किंवा कामवाल्या बाईकडे सोडले जाते. अशा मुलांना त्यांचे पालक त्यांना नोकरीधंद्यामुळे फार वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा मूल कुठलाही हट्ट करेल विशेषतः खाद्यपदार्थांचा तेव्हा साहजिकच तो पुरविण्याकडे पालकांचा कल असतो. हे अन्नपदार्थ बहुतकरून फास्ट फूड, असतात. दिवसभर पोषक अन्नाचा अभाव आणि त्यात फास्ट फूडचा मारा यामुळे मुलांचे अपुरे पोषण होते. लठ्ठपणा हे या अपुऱ्या पोषणाचे मोठे लक्षण आहे. फास्ट फूडमध्ये मुलांच्या सुदृढ वाढीसाठी आवश्यक पोषणद्रव्ये नसतात. यामुळे ती वरून लठ्ठ दिसत असली तरी आतून कुपोषित असतात. याशिवाय शहरी मुले घरी, स्मार्ट फोन, कॉम्प्युटर-लॅपटॉपवरच खेळत राहणे, बैठे खेळ खेळणे, कुठल्याही हालचालीचा अभाव असणे त्याचबरोबर आहारात रेडिमेड फूडचा समावेश असणे ही महानगरातील कुपोषणाची कारणे आहेत. कुरकुरे, वेफर्स, तळलेल्या-चमचमीत पदार्थांच्या सेवनाने कॅलरीजचे प्रमाण वाढत जाते आण‌ि त्याचे पर्यवसान लठ्ठपणात होते. सध्या तर कोरोनामुळे बहुतांश मुले घराबाहेरच पडलेली नाही. मैदाने, उद्याने सोडाच, परंतु आपल्या राहत्या घरातूनही ते बाहेर पडलेली नाहीत. अशाने मुलांत कुपोषण वाढण्याची भीती आहे. यामुळे सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने येत्या काळात या दृष्टिकोनातून शहरीच नव्हे ग्रामीण कुपोषणाचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

- कुपोषणाची लक्षणे

कुपोषणात आढळणारी लक्षणे आपल्याला सर्वज्ञात आहेतच. चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन आण‌ि आहारात पोषकतत्त्वांचा अभाव असलेले अन्न दिल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा येतो. तसेच, कुपोषित मुलांमध्ये स्वभावात अनेक बदल घडतात. कुठल्याच गोष्टीत रस नसणे, चिडचिड करणे आदी लक्षणे दिसून येतात.

- कुपोषण टाळायचे कसे?

कुपोषण टाळण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग म्हणजे मुलाला चौरस आहार देणे. सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध, त्याच्यापुढे दोन वर्षांपर्यंत त्याला अन्नाची दिलेली जोड महत्त्वाची ठरते. कडधान्य, तांदूळ, गहू-ज्वारी यांचा आहारात समावेश असायला हवा. तसेच भात, मोड आलेली कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहारात करणे आवश्यक असते. तसेच, प्रोटिन्सचा सोपे स्रोत म्हणून अंडी, चिकन-मटण देणेही योग्य ठरते.

---------------

Web Title: Get rid of malnutrition in cities now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.