रोजीरोटी हिसकवाल तर रस्त्यावर उतरू!
By admin | Published: January 30, 2016 02:22 AM2016-01-30T02:22:57+5:302016-01-30T02:22:57+5:30
स्मार्ट सिटीच्या नावाखाली फेरीवाल्यांची रोजी-रोटी हिसकवाल तर आम्ही गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा कष्टकरी हॉकर्स युनियनने दिला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई
डोंबिवली : स्मार्ट सिटीच्या नावाखाली फेरीवाल्यांची रोजी-रोटी हिसकवाल तर आम्ही गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा कष्टकरी हॉकर्स युनियनने दिला आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी आयुक्त ई. रवींद्रन यांनी मोठ्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून दाखवावा, असे आव्हानही दिले.
बाजीप्रभू चौकालगतच्या
चिमणी गल्लीतील बाजारपेठेत फेरीवाल्यांची शुक्रवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. त्यामध्ये फेरीवाल्यांचे नेते म्हणाले की, केडीएमसीचे आयुक्त ई.रवींद्रन
यांच्या चांगल्या कामांना आमच्या नक्कीच शुभेच्छा आहेत. परंतु त्यांनी कष्टकरी फेरीवाल्यांचा विचार करावा, तो न केल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
त्यानंतरच्या परिणामांना सर्वांनाच सामोरे जावे लागेल. प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी कसे आहेत याबाबत आम्हाला जाहीरपणे बोलायला लावू नका, असे सूचक भाष्य नेत्यांनी करताच उपस्थितांनी त्याला दाद दिली.
प्रशासनावर टीकास्र संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून फेरीवाल्यांना अपमानास्पद वागणूक मिळते.
देशात अडीच कोटींच्या आसपास फेरीवाले आहेत. त्यांच्यावर १० कोटी नागरिकांची रोजीरोटी अवलंबून आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनावळे, सल्लागार प्रशांत सरखोत यांच्यासह दीपक गावडे, सूर्यकांत भाऊ पाटील, थेटे बाई, शानीबाई माने, बाळाराम भोसले आणि अष्टपाल कांबळे आदींनी मार्गदर्शन केले.