पाठिंबा मिळाला, पण मते मिळतील?, मनसेकडून प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:22 AM2019-04-17T01:22:30+5:302019-04-17T01:22:52+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे.
कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे. या मतदारसंघात मनसेची सव्वा लाखाच्या आसपास मते आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध म्हणून राष्ट्रवादीसाठी मनसे प्रचारात उतरली असली तरी मतदारांचे मन वळवण्यात मनसेचे पदाधिकारी यशस्वी होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या दोन्ही निवडणुका मनसेने लढवल्या होत्या. त्यात मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी या मतदारसंघात सव्वा लाखाच्या आसपास मनसेची मते आहेत. २०१४ च्या निवडणुकीत डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतून अनुक्रमे २६ हजार ५३९ आणि ३१ हजार ४८४ मते मनसेच्या उमेदवाराला मिळाली होती. कल्याण पूर्व आणि अंबरनाथ मतदारसंघातही २१ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. या मतदारसंघातील प्रमुख शहरी भाग असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीत मनसेचे १० नगरसेवक आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक डोंबिवलीतून निवडून गेले आहेत. त्यामुळे मनसेला मानणारा मतदार डोंबिवलीत आहे, हे नाकारून चालणार नाही. मोदी आणि शहांविरोधात सुरू असलेल्या प्रचारात याच मतदारसंघातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याचे सोमवारच्या आघाडीच्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आघाडी आणि पाठिंबा देणाºया पक्षांच्या दोन बैठका झाल्या आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम मात्र या बैठकांपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून मनसेत दोन गट पडले.
दरम्यान, राष्ट्रवादीला मनसेच्या काही पदाधिकाºयांनी साथ दिली असली तरी उमेदवार बाबाजी पाटील यांना मनसेचे मतदार स्वीकारतील का, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. पाटील यांच्या समर्थकांकडून भूमिपुत्राचा नारा दिला जात आहे. त्यात, नुकत्याच पार पडलेल्या आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या बैठकीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादीसारख्या पक्षातच जातीच्या आधारावर मागितला जात असलेला मतांचा जोगवा चर्चेचा विषय ठरला असताना कल्याण-डोंबिवलीतील मनसेचा मतदार राष्ट्रवादीला साथ देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
>मोदी आणि शहा यांना विरोध करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. हे जर पुन्हा निवडून आले, तर सध्याची निवडणूक ही शेवटची ठरेल. पुढे आपल्याला हुकूमशाहीला सामोरे जावे लागेल. गेल्या पाच वर्षांतील भाजपचा कारभार पाहता नागरिक नाराज असून ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मतदार नक्कीच साथ देतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना होईल, यात शंका नाही.
- प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली शहरसंघटक, मनसे