पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:26 IST2019-06-11T00:26:31+5:302019-06-11T00:26:48+5:30
एकनाथ शिंदे : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचाही घेतला आढावा

पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लावा
कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण तसेच कल्याणच्या पत्रीपुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सोमवारी दिले.
भिवंडी-कल्याण-शीळ सहापदरीकरणाच्या कामासह पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी सोमवारी केली. यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शीळ येथून सहापदरीकरणाच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी सुरू केली. भिवंडी-शीळ-कल्याण रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्याच्या कामाचा शुभारंभ ३० डिसेंबर २०१८ ला पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी पत्रीपुलाच्या नव्या उभारणीसाठीच्या कामाचाही शुभारंभ करण्यात आला. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी ३९० कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १५० कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग व २४० कोटी रुपये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून खर्च केले जाणार आहेत. सध्या हा रस्ता चारपदरी असून, त्याचे सहापदरीकरण करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी दुतर्फा गटारे तयार केलेली नाहीत. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ते तातडीने करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटरचा रस्ता हवा. त्यानुसार, हा रस्ता सहापदरीकरणामुळे एकूण ३० मीटर रुंदीचा असावा. त्यासाठी आज काही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मोजमाप करण्यात आले. रस्त्याच्या पाहणीनंतर शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाचा आढावा घेतला. पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पूल उभारण्यासाठी पुलाचे आधारखांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. पुलाच्या वरचा भाग हैदराबाद येथे तयार करण्यात येत आहे. पत्रीपुलाचे काम मार्च २०२० अखेर पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी हे काम डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारीवर्गाने डोळ्यांसमोर ठेवून हे काम गतीने मार्गी लावावे, असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.
बदलापूर जंक्शन येथे हवा उड्डाणपूल
कल्याण-शीळ रस्त्यावर काटई गावानजीक असलेल्या बदलापूर जंक्शनकडून एक रस्ता अंबरनाथमार्गे बदलापूरला जातो. बदलापूर जंक्शन ते पलावा जंक्शन यादरम्यान वाहतूककोंडी होते. तेथे एक एलिव्हेटेड मार्गिका असावी. त्यामुळे या जंक्शनपासून पलावापर्यंत वाहतूककोंडी होणार नाही, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. त्यावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री शिंदे यांनी दिले आहे.