शैक्षणिक साहित्य मिळणे पहिल्या दिवशी अशक्य
By admin | Published: June 9, 2015 11:02 PM2015-06-09T23:02:09+5:302015-06-09T23:02:09+5:30
विरोधकांचाही सत्ताधा-यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार नाही.
अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतींसह सत्ताधारींचा प्रशासनावर अंकुश नसल्याने आणि विरोधकांचाही सत्ताधा-यांवर वचक नसल्याने यंदाही ७४ शाळांमधील ११ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार नाही.
साहित्य खरेदीच्या निविदाच काढण्यात न आल्याने शिक्षण मंडळ सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणण्यासंदर्भातील वृत्त २७ मे रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले आणि २८ मे रोजी त्याबाबतच्या निविदा काढण्यास्ांदर्भातचा मंडळाचा निर्णय झाला होता. मात्र त्या निविदा १३ जून रोजी उघडल्या जाणार असून महापालिकेच्या शाळा १६ जून पासून सुरु होणार आहेत. अवघ्या तीन दिवसात साहित्य खरेदीची प्रक्रिया होणे कठीण आहे.
वेळच्या वेळी शैक्षणिक साहित्य मिळावे, यासाठी मंडळाच्या माध्यमातून त्या संदर्भातील निविदाही काढण्याची मंजूरी ३० एप्रिलच्या सभेत देण्यात आली. मात्र, तरीही मे महिना संपण्याच्या दोन दिवस आधी टेंडर काढल्याने प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर ही नामुष्की येणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
सभापतींवर अविश्वासाचा ठराव आणावा अशी मागणी मंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य धनंजय कांबळे यांनी केली होती. त्या संदर्भातील पत्र त्यांनी २५ मे रोजी पालिका प्रशासनाकडे दिले असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासन काहीना काही कारणे सांगून चालढकल करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला सर्वस्वी सभापती शांताराम पवार जबाबदार असून त्यांचा वचक नसल्यानेच हा मनमानी कारभार सुरु असल्याची टीका होत आहे.
त्यांना निलंबित करा : या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोणी प्रशासकीय अधिकारी अथवा प्रशासनावर वचक नसलेले मंडळाचे पदाधिकारी जबाबदार असतील त्यांना निलंबित करावे.
- शशिकांत कांबळे, शिक्षण मंडळ सदस्य