लग्न लागण्यापूर्वी मंडपात तहसीलदार, पोलीस पोहोचले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:49 AM2019-11-21T00:49:10+5:302019-11-21T06:33:26+5:30
कसाऱ्यात लग्न लागण्यापूर्वी मंडपात पोलीस कर्मचारी पोहोचले
- श्याम धुमाळ
कसारा : सोमवारी जोरदार तेला (हळद पार्टी) झाली. मंगळवारी सकाळी हळद लागली. सकाळी १० नंतर लग्नाची लगबग सुरू झाली. दुपारी १२ वाजण्याच्या जवळपास एक लग्न व दुपारी ३ वाजता दुसरे, असे दोन लग्न सोहळे मोखवणे येथे होते. यादरम्यान दोनपैकी एक विवाह हा अल्पवयीन जोडप्याचा होता. १२ वर्षांची चिमुरडी आणि १८ वर्षांच्या मुलाचा हा विवाह होता. परंतु, या बालविवाहाची माहिती शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी आणि ठाणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना होताच, त्यांनी यंत्रणेच्या मदतीने हा बालविवाह रोखला.
अधिकाऱ्यांनी विवाहस्थळ गाठले, तेव्हा एका अल्पवयीन मुलीला हळद लावून डोक्याला बाशिंग बांधून लग्नमंडपात आणण्याची तयारी सुरू होती. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या या चिमुरडीचे गावातीलच एका १७-१८ वर्षांच्या मुलाशी लग्न लागणार होते. मात्र, विवाहस्थळी पोलीस व अन्य लोक आल्याने मांडवातील वऱ्हाडी व मुलामुलीच्या घरच्यांनी एकच गोंधळ घातला. समयसूचकता दाखवून अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केले. स्थानिक महिला बचत गटाच्या सदस्य तसेच शिक्षकांना सोबत घेऊन मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. मात्र, परिस्थितीने घायाळ असलेल्या पालकांनी आपल्या गरिबीचे व आजाराचे भीषण वास्तव मांडले. यावर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करत तोडगा काढला. यावर चिमुरडीच्या पालकांनी सहमती दर्शवली. त्यानंतर सर्वांना तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांच्याकडे आणण्यात आले. त्यांची समजूत काढत शिक्षणाचे महत्त्व व बालविवाहाचे दुष्परिणाम याची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मेंगाळ व महिला दक्षता समितीच्या सदस्या उपस्थित होत्या. कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक के.बी. केंद्रे, मंडळ अधिकारी चौधरी, तलाठी भरत गांजवे, ग्रामविकास अधिकारी पाकळे यांच्यासह पोलीस पाटील पांडुरंग भोईर यांनी ही परिस्थिती हाताळली.
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाहामुळे मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण यासारखे प्रकार पुढे येत आहेत. बालविवाह रोखण्यासाठी त्रास झाला असला तरी, समुपदेशनामुळे चिमुरडीचे पालक तिला उच्च शिक्षण देण्यास तयार झाले.
- नीलिमा सूर्यवंशी, तहसीलदार, शहापूर
माझ्या डोळ्यांदेखत लगीन होऊ द्या...
साहेब, माझ्या मुलीचे लगीन माझ्या डोळ्यांदेखत होऊ द्या. मला आजार आहे. आम्ही वीटभट्टीवर काम करतो. लग्नासाठी व्याजाने पैसे काढलेत साहेब, असे वास्तव वधूपित्याने अधिकाºयांसमोर मांडले. मात्र, अधिकाºयांनी याचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर मुलीला शाळा शिकवण्याचा संकल्प या पित्याने सोडला.