घनश्याम भतीजा हत्या प्रकरण : माजी आमदार पप्पू कलानींसह 7 जणांचा निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 08:23 PM2017-11-18T20:23:46+5:302017-11-18T20:24:23+5:30
इंदर भतीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले पप्पू कलानी यांच्यासह 7 जणांची घनश्याम भतिजा प्रकरणात कल्याण विशेष सत्र न्यायालयाने शनिवारी निर्दोष मुक्तता केली.
सदानंद नाईक/ उल्हासनगर - इंदर भतीजा हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले पप्पू कलानी यांच्यासह 7 जणांची घनश्याम भतिजा प्रकरणात कल्याण विशेष सत्र न्यायालयाने शनिवारी निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाने कलानी यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे.
उल्हासनगरात फेब्रुवारी 1990 साली भर दिवसा भाजपा पदाधिकारी घनश्याम भतीजा यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनं देशभरात खळबळ उडाली होती. बरोबर एका महिन्यापूर्वी घनश्याम यांचा मोठा भाऊ इंदर यांची हत्या करण्यात आली होती. घनश्याम भतीजा हत्या प्रकरणी तत्कालीन आमदार पप्पू कलानी, नरेंद्र रामसिंघाणी, बाबा गैब्रियल, बच्ची पांडे, अर्षद शेख व रिचर्ड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. तर 4 वर्षांपूर्वी इंदर भतीजा हत्या प्रकरणात कलानी यांच्यासह अन्य जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. कलानी यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्याची 10 ते 27 नोव्हेंबर अशी 17 दिवसासाठी पेरॉलवर सुटका झाली आहे.
माजी आमदार जालना पेरॉल सुट्टीचा आनंद भोगताना कलानी यांच्यासह 7 जणांना घनश्याम भतीजा हत्या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले, अशी माहिती पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी व तक्रारदार कमल भतीजा यांनी दिली. तक्रारदार भतीजा यांनी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले. कल्याण विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी एस हातरोटे यांच्या कोर्टात हा खटला चालला असून कलानी यांच्यासह इतरांची बाजू मुंबईचे वरिष्ठ वकील हर्षद पोंडा यानी मांडली आहे.