२५० वर्षांचा इतिहास असलेले घंटाळी देवी मंदिर; ठाणेकरांचे श्रद्धास्थान घंटाळी देवी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 09:45 AM2023-10-20T09:45:37+5:302023-10-20T09:45:55+5:30
प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील आणखी एक जागृत देवस्थान म्हणून घंटाळी देवी मंदिराची ख्याती आहे. जवळपास ...
प्रज्ञा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील आणखी एक जागृत देवस्थान म्हणून घंटाळी देवी मंदिराची ख्याती आहे. जवळपास २५० हून अधिक वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या मंदिरात ठाणे शहरातूनच नव्हेतर, परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवात या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची वर्दळ असते. १८८० सालच्या गॅझेटमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. गेल्या चार वर्षांपासून हिंदू जागृती न्यासाकडे या मंदिराचे व्यवस्थापन आहे आणि त्यांच्या माध्यमातून २१ उपक्रम राबविले जातात.
घंटाळी मंदिर हे शहरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र झालेले आहे. घंटाळी देवी, महिषासुरमर्दिनी आणि दुर्गादेवी या तीन देवी एकाच पाषाणावर प्रगट झाल्या.
अष्टमीला नवचंडी याग
देवीच्या आजूबाजूचा परिसर घंटाळी देवी मार्ग या नावाने ओळखला जातो. या मंदिराच्या बाजूला एक मोठे तळे होते आणि तळ्याच्या काठावर या देवी प्रगटल्याची कथा आहे.
हिंदू जागृती न्यासाकडे या मंदिराचे व्यवस्थापन आल्यावर त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. पंचमीला या मंदिरात कुमारिका पूजन केले जाणार आहे.
१०१ कुमारिकांची यात पूजा केली जाईल. या वर्षीपासून दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा मानस ओक यांनी व्यक्त केला.
अष्टमीला २२ ऑक्टोबर रोजी नवचंडी याग होणार आहे. हिंदू जागृती नवरात्र मंडळ व घंटाळी मंदिर व्यवस्थापन समिती आयोजित कुंकुमार्चन कार्यक्रम रविवारी होणार आहे.
नवरात्रोत्सवात रोज पाच हजार भाविक येतात दर्शनासाठी
या देवीला नवस बोलणारे भाविक नवस फेडताना घंटा बांधतात म्हणून या देवीला ‘घंटाळी देवी’ असे नाव प्रचलित झाले. या मंदिरात तीन गाभारे असून, एका गाभाऱ्यात तीन देवी तर दुसऱ्या गाभाऱ्यात राम आणि तिसऱ्या गाभाऱ्यात शंकराचे मंदिर आहे. देवीचे आणि शंकराचे गाभारे हे पूर्णपणे दगडी बांधकामात केलेले आहेत, अशी माहिती हिंदू जागृती न्यासाचे अध्यक्ष मंगेश ओक यांनी दिली. नवरात्रोत्सवात दर दिवशी पाच तर मंगळवार, शुक्रवार, पंचमी आणि अष्टमीला दर दिवशी दहा हजार भाविक येतात. या मंदिराला पेशव्यांकडून दरवर्षी वर्षासन होते, असेही ओक यांनी सांगितले.