भीमाशंकरला जाणारा घाट बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:38 AM2019-07-31T01:38:38+5:302019-07-31T01:38:54+5:30
वादळी पावसामुळे लोखंडी शिड्या तुटल्या : घाट बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाने काढले आदेश
नेरळ : बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे श्रावण महिन्यात भक्तांची प्रचंड गर्दी असते. सोमवारी तर लाखोंच्या संख्येने शिवभक्त, भीमाशंकरला ट्रेकिंग करीत जाणारे ट्रेकर्स हे कर्जत तालुक्यातून असलेल्या पायवाटेने जातात. या पायवाटेतील महत्त्वाची आणि ट्रेकर्सला आवडणारी पायवाट म्हणजे शिडी घाट. आव्हानात्मक असलेला हा शिडी घाट यावर्षी बंद झाला आहे. दरम्यान, त्या बाबत रायगड जिल्हा प्रशासनाने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन शिडी घाट बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
भीमाशंकरला खांडस मार्गे जाणाऱ्या भाविकांची रीघ लागली आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरला जाण्याकरिता रेल्वेने नेरळ किंवा कर्जत स्टेशन आणि तेथून कशेळे येथे आल्यानंतर कशेळे येथून दर १५ मिनिटांनी खांडसकडे जाणाºया मिनिडोअरने १४ कि.मी. अंतरावरील काठेवाडी (खांडस) येथून जाण्याकरिता दोन मार्ग आहेत. थोडासा अवघड असणाºया शिडी घाट मार्गे भीमाशंकरला पोहोचता येते. अनेक वर्षांपासून असलेली लाकडी शिडी बदलून त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावल्याने धोकादायक मार्ग थोडा सोपा झाला होता. मात्र, या वर्षी सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयाने शिडी घाटातील त्या लोखंडी शिड्या कोसळल्या आहेत.
दगडाचे एक २५ फूट उभे कातळ चढून जावे लागणारा शिडी घाट हा भीमाशंकर अभयारण्य पाहण्यासाठी येणाºया ट्रेकर्सचा आवडीचा मार्ग आहे. आव्हानात्मक असलेल्या या मार्गाने सराईत ट्रेकर्स आपले प्लॅन प्रामुख्याने पावसाळ्यात करीत असतात. मात्र, या वर्षी ट्रेकर्सला शिडी घाटातून भीमाशंकर गाठता येणार नाही. कारण शिडी घाटातील काही प्रमुख शिड्या यांच्यापैकी एक मुख्य शिडी वादळात कोसळली आहे.
आम्ही खांडस येथे फलक लावून शिडी घाट बंद असल्याची माहिती देणार आहोत, त्याच वेळी त्या फलकांवर शिडी घाटातील मोडलेल्या लोखंडी शिड्या यांचे फोटो मोठ्या आकारात टाकले आहेत. ते बॅनर अन्य महत्त्वाच्या रस्त्यावरही लावले जाणार आहेत.
- वैशाली परदेशी, प्रांत अधिकारी