शाळा खाजगी संस्थेला देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:37 AM2018-06-01T00:37:53+5:302018-06-01T00:37:53+5:30
विद्यार्थी संख्येअभावी मराठी शाळांना घरघर लागली असताना पटसंख्या चांगली असतानाही केडीएमसीची मोहने येथील शांताराम महादु पाटील ही शाळा खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा
कल्याण : विद्यार्थी संख्येअभावी मराठी शाळांना घरघर लागली असताना पटसंख्या चांगली असतानाही केडीएमसीची मोहने येथील शांताराम महादु पाटील ही शाळा खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक कडोंमपा या शिक्षकांच्या संघटनेने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.
केडीएमसीच्या आजच्याघडीला ६४ शाळा आहेत. यामधील काही शाळांचा विद्यार्थीपट समाधानकारक नसला तरी काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या चांगली आहे. आता त्या शाळा देखील खाजगी संस्थांना भाडेतत्वावर चालवायला दिल्या जाऊ लागल्या आहेत.
मोहने येथील शाळेचा पट ८० च्या आसपास असतानाही यशोदीप शिक्षण संस्थेला शाळा चालवायला देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असल्याचे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सोनजे यांनी सांगितले. यशोदीप संस्थेला खाजगी वर्ग शाळेत चालवण्याची परवानगी देण्यात आली होती.
परंतु आता संपूर्ण शाळाच त्यांना चालवायला देण्याचा घाट घालणे म्हणजे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान असल्याचे शिक्षक संघटनेचे सचिव निलेश वाबळे यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने खाजगी संस्थेच्या दावणीला महापालिकेची शाळा बांधली तर शिक्षक १५ जूनला शाळा उघडणार नाहीत. त्याचबरोबर महापालिकेचे सव्वातीनशे शिक्षक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा कार्याध्यक्ष भगवान हमरे यांनी दिला.
यासंदर्भात आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे शिक्षक संघटनेनी ‘लोकमत’ला सांगितले. या महापालिका शाळेच्या बाजुला असलेली आश्रमशाळा पंढरपूरला स्थलांतरीत झाल्याने तेथील विद्यार्थी महापालिकेच्या शाळेत समाविष्ट झाले तर पट अधिकच वाढणार असल्याचे शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे.