मालमत्तेच्या व्यवहारात घाटकोपरच्या व्यावसायिकाची ३.५0 लाखांनी फसवणूक, ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 09:27 PM2018-01-22T21:27:00+5:302018-01-22T21:31:04+5:30
ठाणे :दुसर्याची मालमत्ता विकण्याच्या नावाखाली घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला.
ठाणे : जमिन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५0 हजार रुपयांनी फसवणूक करणार्या भिवंडी येथील एका आरोपीविरूद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.
घाटकोपर येथील डॉक्टर चाळीत राहणारे सुरज रामलखन गुप्ता यांना २0११ साली जमिन विकत घ्यायची होती. हा विषय त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. या मित्राने पडघा येथील तळवली येथील अमजद अन्सार गोरे याच्याशी गुप्ता यांची भेट घालून दिली. अमजदने तळवली येथील एक जमिन विकायची असल्याचे सांगितले. या जागेची सर्व कागदपत्रे त्याने गुप्ता यांना दाखवली. या जागेचा व्यवहार ८ लाख ५0 हजार रुपयांमध्ये निश्चित झाला. इसाराची रक्कम म्हणून ३ लाख ५0 हजार रुपये गुप्ता यांनी दिले. उर्वरित ५ लाख रुपये खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. इसाराची रक्कम घेताना अमजदने मुळ जमीन मालकाच्या बनावट सह्या केल्या. साठेकरारामध्येही मालकाची खोटी सही केली. खरेदीसाठी पाच लाख रुपयांची जुळवाजुळव झाल्यानंतर गुप्ता यांनी अमजदशी संपर्क साधला असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. गुप्ता यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवहाराची तिथे नोंदच झाली नसल्याचे उघडकीस आले. गुप्ता यांनी अमजदला ३ लाख ५0 हजार रुपये परत मागितले असता, त्याने शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. गुप्ता यांनी याप्रकरणी राबोडी पोलिसांकडे याप्रकरणी रविवारी तक्रार दिली. त्यानुसार अमजद अन्सार गोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अमजद याने अशा प्रकारे फसवणूक केल्याची तक्रार यापूर्वीही एकदा दाखल झाली असल्याचे तपास अधिकारी सुजित गडदे यांनी सांगितले.