घोलवडचे चिकू अतिवृष्टीने संकटात

By admin | Published: August 10, 2016 02:28 AM2016-08-10T02:28:51+5:302016-08-10T02:28:51+5:30

मागील पंधरवड्यापासून डहाणू तालुक्यात अतिवृष्टी होऊन बागायतींमधील चिकू फळाची मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चिकू उत्पादन घटून बागायतदारांवरील

Ghee Pakhwa chiku in trouble | घोलवडचे चिकू अतिवृष्टीने संकटात

घोलवडचे चिकू अतिवृष्टीने संकटात

Next

अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
मागील पंधरवड्यापासून डहाणू तालुक्यात अतिवृष्टी होऊन बागायतींमधील चिकू फळाची मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चिकू उत्पादन घटून बागायतदारांवरील आर्थिक संकटाची छाया गडद झाली आहे. दरम्यान शासनाने चिकू पिकाला नुकसान भरपाई जाहीर करून विम्याची संपूर्ण रक्कम तत्काळ देऊन मदतीचा हात द्यावा अशी मागणी चिकू उत्पादकांनी केली आहे.
डहाणू तालुक्यातील चिकू हे प्रमुख फळपीक असून साडेचारहजार हेक्टर क्षेत्र बागायतीने व्यापले आहे. साडेतीन वर्षांच्या अथक प्रयत्नाने यावर्षी पाच पिकांना भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. त्यामध्ये चिकूचा समावेश करण्यात आला असून डहाणूतील महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने या साठी अर्ज केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथील चिकूवर घोलवड या प्रादेशिक ओळखीच्या प्रमाणपत्राची मोहर उमटली आहे.
जागतिक बाजारपेठेत चिकूचे दर्जेदार फळ पाठविल्यानंतर या भागाची वेगळी ओळख आणि उत्पादकांना भरघोस आर्थिक लाभ मिळणार असल्याने चिकू बागायतदारांनी कर्ज काढून मजूर, विविध खते व औषधे इ. करिता मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे.
या वर्षी पावसाचे वाढते प्रमाण सुखावणारे असले, तरी मागील पंधरवड्यापासून डहाणू तालुक्याला पावसाने झोडपल्याने चिकूवर बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. पडत्या पावसात औषध फवारणी करणे अशक्य असून परिणामकारक नाही. शिवाय जोराचे वारे आदीमुळे मोठ्याप्रमाणावर चिकूची फळगळती झाली आहे. चिकूच्या तिन्ही बहरांवर अनिष्ट परिणाम होऊन वर्षभरातील एकूण उत्पादनाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन बागायतदार देशोधडीला लागणार आहे.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर या वर्षी चिकूला फळपीक विम्याचे संरक्षण लाभले मात्र विम्याची रक्कम भरण्याचा कालावधी अल्पदिवसांचा होता. शिवाय शेवटच्या घटकापर्यंत माहिती न पोहचल्याने निम्मे चिकू बागायतदार विम्याच्या कवचपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान या संकटातून सावरण्यासाठी चिकू पीक विम्याची शंभर टक्के रक्कम चिकू उत्पादकांना तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी लोकमतच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Ghee Pakhwa chiku in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.