घोडबंदरला वाहतूककोंडी; पाच मिनिटांच्या प्रवासासाठी दीड तास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:17 AM2019-01-03T04:17:29+5:302019-01-03T04:19:24+5:30

घोडबंदरला जाण्याचा विचार करत असाल तर, सावधान. आधी गुगल मॅपवर या भागात वाहतूककोंडी आहे किंवा नाही, याची खात्री करा आणि मगच घोडबंदरला जाण्याचा निर्णय घ्या.

Ghodbandar road traffic; One-and-a-half hour journey | घोडबंदरला वाहतूककोंडी; पाच मिनिटांच्या प्रवासासाठी दीड तास

घोडबंदरला वाहतूककोंडी; पाच मिनिटांच्या प्रवासासाठी दीड तास

Next

ठाणे : घोडबंदरला जाण्याचा विचार करत असाल तर, सावधान. आधी गुगल मॅपवर या भागात वाहतूककोंडी आहे किंवा नाही, याची खात्री करा आणि मगच घोडबंदरला जाण्याचा निर्णय घ्या. अन्यथा, तुम्हाला पाच ते सात मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तब्बल एक ते दीड तास तारेवरची कसरत करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहणार नाही. घोडबंदर भागात एकाच वेळी मुख्य रस्त्यासह सेवारस्त्यावरही विविध कामे सुरु असल्याने वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. एकीकडे ठाणे शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना सुरळीत वाहतुकीची सुविधाही नागरिकांना उपलब्ध होत नसल्याचे दिसत आहे.
घोडबंदर परिसर हा नवे ठाणे म्हणूनही ओळखला जातो. परंतु, सध्या येथील चारपदरी रस्त्यावर आणि सेवारस्त्यावरही वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाय काढणे तर सोडाच, परंतु ही कोंडी कशी फुटेल, यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न होत नाहीत. मागील काही महिन्यांपासून या भागात वडाळा ते गायमुख या चौथ्या मेट्रोमार्गाचे काम सुरू झाले आहे. या मेट्रोचा मार्ग नागमोडी पद्धतीचा राहणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर भागात अनेक ठिकाणी कुठे सेवारस्त्यावर, तर कुठे मुख्य रस्त्याच्या मधोमध पत्रे लावले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. भरिस भर, हे काम सुरू असतानाच पातलीपाड्यापासून पुढे पालिकेच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांवर सिव्हरेज लाइन टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी असल्याने वाहनचालक सेवारस्त्यांचा वापर करीत आहेत. परंतु, हे सेवारस्ते आधीच पार्किंगने फुल्ल झाले असल्याने आणि आता सिव्हरेज लाइनचे कामही सुरूअसल्याने एक-एक मीटर अंतर कापताना वाहनचालकांची दमछाक होत आहे.
ठाण्याच्या मध्यभागातील कोंडी कशीबशी फोडून वाहनधारक कापूरबावडीपर्यंत पोहोचला, की पुढे जाताना पुन्हा तेथूनच कोंडी सुरू होते. ती थेट आनंदनगरपर्यंत पाहावयास मिळते. हलक्या वाहनांसह अवजड वाहनांची वाहतूकही याच मार्गावरून होत असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.
मेट्रोच्या कामासाठी मुख्य रस्त्याच्या मधोमध पत्रे लावण्यात आल्याने हा चारपदरी रस्ता आता दुपदरी झाला आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा आनंदनगरपासून थेट कापूरबावडीपर्यंत लागत आहेत. तुम्ही घोडबंदरच्या दिशेकडून ठाण्याकडे येत असाल, तर गायमुखपासूनच कोंडीचा सामना करावा लागतो. पातलीपाड्यापर्यंत मुख्य रस्ता आणि सेवारस्त्यावर तारेवरची कसरत करूनच मार्ग काढावा लागत आहे. एकाच वेळी सेवा आणि मुख्य रस्त्यावर कामे सुरू असून, कोलमडलेली सिग्नल यंत्रणा आणि अपुरे पोलीस बळ यामुळे कोंडी फुटणे अवघड झाले आहे.

सेवारस्त्याला अनधिकृत पार्किंगचा विळखा
ठाण्यासह घोडबंदर मार्गावरील सेवारस्त्यांवर सध्या सिव्हरेज लाइनची कामे सुरू आहेत. त्यातच या भागातील दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांना सध्या अनधिकृत पार्किंगचा विळखा पडला आहे. विविध शोरूम, गॅरेजचालकांच्या गाड्या याच सेवारस्त्यांवर पार्क होत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.

सोशल मीडियावर टीका
घोडबंदर मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीच्या विरोधात सोशल मीडियावर वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाविरोधात टीका होऊ लागली आहे. स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवणाºया महापालिका प्रशासनाने आधी ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका करावी, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

विद्यार्थ्यांचे हाल
घोडबंदर रोडवर होणाºया वाहतूककोंडीचा सर्वात मोठा फटका दुपारच्या सत्रात शाळेत जाणाºया मुलांना बसत आहे. घरापासून जवळच्या भागात शाळा असूनही अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना लेटमार्कला सामोरे जावे लागत आहेत.

मेट्रोचे काम संपेपर्यंत वाहतूककोंडी कायम राहणार
वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आधीच अपुरा असलेला घोडबंदरचा रस्ता आणि सेवारस्त्यांवर सुरू असलेल्या इतर कामांसह मेट्रोच्या कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी कमी पडत आहे. अवजड वाहनांसाठी १२ ते ४ ही वेळ असल्याने याच कालावधीत वाहतूककोंडी होताना दिसते. त्यात घोडबंदर मार्गाला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक जंक्शनवर कर्मचारी देऊन कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु, मेट्रोचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही कोंडी कायम राहणार आहे. - अमित काळे, वाहतूक पोलीस, उपायुक्त

Web Title: Ghodbandar road traffic; One-and-a-half hour journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे