घोडबंदर-बोरिवली सर्वाधिक अवैध वाहतूक, २० प्रवासी कोंबून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:58 AM2018-02-06T02:58:57+5:302018-02-06T02:59:02+5:30
शहरातील घोडबंदर-बोरिवली या मार्गावर खासगी बसगाड्यांमार्फत प्रवाशांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बिनधास्त कोंबून खासगी वाहनांकडून बेकायदा वाहतूक सुरू आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : शहरातील घोडबंदर-बोरिवली या मार्गावर खासगी बसगाड्यांमार्फत प्रवाशांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बिनधास्त कोंबून खासगी वाहनांकडून बेकायदा वाहतूक सुरू आहे. ब-याचदा यामुळे अपघात होऊन जीवितहानी होत आहे.
ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातून मुलुंडच्या दिशेने, तर तीनहातनाका आणि सिडको बसस्थानक भागातून खाजगी बसगाड्या अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. बोरिवली-घोडबंदर मार्गावर सुमारे ५० बसद्वारे अवैध वाहतूक सुरू असल्याचे एका पाहणीत आढळले आहेत. मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या या अवैध प्रवासी वाहतुकीचा टीएमटी, एनएमटी, बेस्ट आदी परिवहन सेवांना फटका बसत आहे.
याखेरीज, कल्याण-मुरबाड महामार्गावर मुरबाड तालुक्यातील सुमारे ७०० जीप अवैध प्रवासी वाहतूक करतात, असे निदर्शनास आले आहे. मुरबाड-बदलापूर, म्हसा-धसई, मुरबाड-म्हसा, शेवगाव-टोकावडे, मुरबाड-शहापूर आदी मार्गांवर या जीप मनमानी पद्धतीने जास्त प्रवासी कोंबून वाहतूक करत आहेत. महिनाकाठी केवळ ५०० रुपयांच्या कृपाशीर्वादावर हा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सहा प्रवासी अधिक एक ड्रायव्हर असा अधिकृत परवाना असलेल्या जीपगाड्यांमध्ये कमीतकमी, १३ तर जास्तीतजास्त २० प्रवासी बिनदिक्कत कोंबण्यात येतात, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जाते. या अवैध वाहनांतील प्रवासी एसटी महामंडळाकडे वळवण्याकरिता एक स्वतंत्र जीप प्रत्येक तालुक्यात फिरते. त्यामध्ये एक आरटीओ अधिकाºयासह एसटीचा अधिकारी व इन्स्पेक्टरची असतात. मात्र, अवैध प्रवाशांना आळा घालणे, त्यांना फारसे शक्य झालेले नाही.
>एसटी महामंडळाची कबुली
कल्याण-भिवंडी, मुरबाड-अंबरनाथसह शहापुरातील डोळखांब, टिटवाळा, शहापूर, अनगाव, वासिंद, कसारा आणि नाशिकपर्यंत हजारो प्रवासी अवैध वाहनांतून किंवा मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून प्रवास करत असल्याचे एसटी महामंडळाच्या ठाणे कार्यालयाने कबूल केले.