घोडबंदर किल्ल्यासाठी होतोय विलंब!
By Admin | Published: January 12, 2016 02:22 AM2016-01-12T02:22:28+5:302016-01-12T02:22:28+5:30
ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किल्ल्याच्या सभोतालचा परिसर ठाणे महापालिकेकडे (टीएमसी) हस्तांतर होणे गरजेचे आहे. परंतु, सुमारे एक
- सुरेश लोखंडे, ठाणे
ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किल्ल्याच्या सभोतालचा परिसर ठाणे महापालिकेकडे (टीएमसी) हस्तांतर होणे गरजेचे आहे. परंतु, सुमारे एक वर्षापासून हा विषय फाईलमध्येच अडकल्यामुळे हस्तांतरणास विलंब झाल्याचा सूर जिल्हा नियोजन समितीत ऐकायला मिळाला. घोडबंदर किल्ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असून, पुरातत्त्व खात्याच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे तेथे सोयीसुविधा देण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.
पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्यास लागून असलेल्या महामार्गासदेखील घोडबंदर रोड म्हणून संबोधले जात आहे. ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्राजवळील हा घोडबंदर किल्ला ठाणे, मुंबई परिसरासह राज्यातील गडकिल्ले पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. ऐतिहासिक असलेला हा किल्ला ठाणे शहराचे भूषण आहे. परंतु, डागडुजीअभावी त्याची दयनीय अवस्था झाली आहे. याशिवाय, आजूबाजूच्या परिसरात गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे.
एका बाजूला डोंगरदऱ्या तर दुसऱ्या बाजूला खाली नागलाबंदर, घोडबंदर खाडी या निसर्गाच्या सान्निध्यातील या किल्ल्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. याशिवाय, खाली असलेल्या उच्चभ्रू लोकांच्या गगनचुंबी इमारती त्याची शोभा वाढवत आहेत. निसर्गाचे योगदान लाभलेल्या या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या सोयीसुविधा देणे क्रमप्राप्त आहे. पण, त्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाकडून विरोध होत असल्याचे उघड झाले आहे.
किल्ल्याचा परिसर महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा ठराव मागील दीड वर्षापूर्वीच झाला असून, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नुकत्याच झालेल्या डीपीसी बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. परंतु, वन विभागाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.