घोडबंदर ते खारबाव मार्ग खाडीपुलामुळे होणार सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:43 AM2018-11-14T04:43:36+5:302018-11-14T04:43:59+5:30
प्रस्ताव महासभेपुढे : महापालिका तयार करणार डीपीआर
ठाणे : ठाणे शहरापासून जवळ असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा नवीन ठाणे म्हणून विकास केला जाणार आहे. त्यात आता घोडबंदर ते खारबाव असा खाडी पूलही उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
याचा सविस्तर प्रकल्प अहवाल ठाणे महापालिका तयार करणार असून यासंदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. यासाठी १ कोटींचा खर्च केला जाणार आहे. परंतु, या उड्डाणपुलामुळे गुजरात, भिवंडी, कल्याण, वसई आदी ठिकाणी जाणाऱ्या वाहन चालकांना हा पर्यायी मार्ग मिळणार असून यामुळे वेळेचीही बचत होणार आहे.
नवीन ठाणे हे ठाणे महापालिका क्षेत्राला जोडण्याचा विचार सुरू झाला आहे. तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या कार्यकाळात ही संकल्पना पुढे आली होती. आता सहा वर्षानंतर याला खºया अर्थाने मूर्त स्वरुप प्राप्त होणार आहे. या पाच गावांचा विकास करतानाच घोडबंदर ते खारबाव असा खाडी पूल उभारण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. घोडबंदर ते मोघरपाडापर्यंतचा सुमारे अडिच किमीचा डीपी रस्ता दर्शविला आहे. तो तयार करतानाच मोघरपाडा ते पुढे १०० मीटरपर्यंत खाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ताही तयार करण्यात येणार आहे. तेथून पुढे एमएमआरडीएच्या माध्यमातून ४०० मीटरचा खाडीपूल उभारण्यात येणार आहे. तो थेट खारबाव स्टेशनपर्यंत जाणार आहे. ज्या ठिकाणी वसई, अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रादेशिक आराखड्यात दर्शविण्यात आला आहे, त्यालाही हा पूल फायदेशीर ठरणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
सध्या घोडबंदर मार्गावरून चेना ब्रीज ते पुढे वर्सोवा पुलापर्यंतचा रस्ता कापण्यासाठी चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या पर्यायामुळे वर्सोवा पुलाआधीच वसई फाट्यावरुन थेट खारबाव गाठून पुढे खाडी पूलमार्गे मोघरपाडा मार्गे ठाण्याच्या दिशेने जाणे शक्य आहे.
ठामपा सहा महिन्यात प्रस्ताव मार्गी लावणार
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या खाडी पुलाचा प्रस्ताव मंजूर झाल्यापासून पुढील चार महिन्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार हे सर्व काम साधारणपणे सहा महिन्यात मार्गी लावण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या संदर्भात आता सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
या पुलामुळे वर्सोवा, फाउंटन येथे होणारी वाहतूककोंडीसुद्धा फुटणार आहे. याशिवाय ज्यांना खारबाववरून कल्याण, घोडबंदर, किंवा गुजरातच्या दिशेने जायचे असेल त्यांनाही हा खाडीपूल फायदेशीर ठरणार आहे. नागरिकांत याची उत्सुकता आहे.