टोमॅटोच्या चिखलाने घोडबंदर रोड पाच तास बंद; ताबा सुटल्याने ट्रक उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:41 AM2024-01-24T07:41:20+5:302024-01-24T07:41:35+5:30
मानपाडा पुलावर कंटेनर बिघडला
ठाणे : घोडबंदरवासीयांची वाहतूककोंडी पाठ काही सोडत नाही. मंगळवारी घोडबंदर रोडमार्गे बोरीवलीला जाणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने टोमॅटोचा ट्रक पातलीपाडा उड्डाणपुलावर उलटला. पहाटे चार ते सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे दोन ते तीन टन टोमॅटो रस्त्यावर पसरून अक्षरशः चिखल झाला होता. तसेच ट्रकमधील ऑइल रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
पाच तासांच्या प्रयत्नानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत होत असताना सकाळी ११ च्या सुमारास मानपाडा उड्डाणपुलावर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कंटेनरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महेंद्र गुप्ता यांच्या मालकीच्या ट्रकमधून सुमारे दोन ते तीन टन टोमॅटो हे शिरपूर येथून घोडबंदर रोडवरून चालक बोरीवलीला घेऊन निघाला होता. ठाण्यातून जाताना पातलीपाडा उड्डाणपुलावर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक उलटला. या घटनेत ट्रकमधील टोमॅटो रस्त्यावर पसरले तसेच तेलही सांडले.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी या विभागांनी धाव घेतली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून घटनास्थळावरून ट्रकचालक पळून गेला. त्यानंतर अपघातग्रस्त ट्रक हायड्रा मशीनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आला.
याशिवाय पातलीपाडा उड्डाणपुलावरती पडलेले टोमॅटो जेसीबीने घंटागाडीत भरण्यात आले. घनकचरा विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने टोमॅटो उचलण्यात आले, तर टोमॅटो पडून चिखल झालेल्या रस्त्यावर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाणी मारून तो रस्ता साफ करण्यात आला.
विद्यार्थ्यांना लेटमार्क
मानपाडा येथील उड्डाणपुलावर कंटेनर बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककाेंडी झाली. या कोंडीतून सुटण्यासाठी वाहन चालकांनी हिरानंदानीमार्गे आझादनगर, ढोकाळी या मार्गाचा अवलंब केला. मात्र, एकाच वेळी अनेक वाहने येथील अंतर्गत रस्त्यांवर आल्याने या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास वाहतूक पोलिसांनी कंटेनर हटविण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर संथ गतीने वाहतूक सुरू झाली; परंतु यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना काहीसा लेटमार्क लागला.
माती टाकल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू
सांडलेल्या तेलावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांमार्फत माती टाकण्यात आली. त्याच्यानंतर पातलीपाडा उड्डाणपूल सुमारे पाच तासांच्या प्रयत्नानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.