लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

By धीरज परब | Published: July 29, 2023 07:41 PM2023-07-29T19:41:01+5:302023-07-29T19:43:19+5:30

बेकायदेशीर भराव व बांधकामांमुळे ही पूरस्थिती निर्माण होत आहे . 

ghodbunder road is sinking due to construction filling in lakshmi river basin and eco sensitive zone | लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

लक्ष्मी नदी पात्र व इकोसेन्सेटेटिव्ह झोनमध्ये झालेला वारेमाप भराव, बांधकामाने बुडतोय घोडबंदर मार्ग 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - केवळ मुंबई - ठाणे - पालघर जिल्हाच नव्हे तर देशभराला जोडणारा चेणे व वरसावे भागातील घोडबंदर महामार्ग हा गेल्या काही वर्षां पासून दरपावसाळ्यात पाण्यात बुडून वाहतूक बंद होण्याची नामुश्की सरकार व महापालिकेवर ओढवत आहे .  लक्ष्मी नदी पात्रा सह परिसरातील नैसर्गिक ओढे तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्रात झालेल्या बेकायदेशीर भराव व बांधकामां मुळे हि पूरस्थिती निर्माण होत आहे . 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील काजूपाडा , चेणे , वरसावे  हि गावे निसर्गरम्य अशी आहेत . घनदाट हिरवळ व डोंगर परिसरात वसलेल्या ह्या निसर्गरम्य परिसरावर गेल्या काही वर्षात हॉटेल व्यावसायिक , राजकारणी आदींची वक्रदृष्टी पडली आहे . आदिवासी बहुल भाग असून देखील आदिवासींच्या जमिनींवर बेकायदा बांधकामे उभी राहण्या पासून त्यांच्या जमिनी विविध गैरमार्गाने बळकावल्या जात आहेत . 

वरसावे भागात डोंगरांवरून येणारे पाणी हे खालील कांदळवन तसेच पाणथळ क्षेत्रात साचून रहायचे . येथे सरकारी तलाव भरणी करून बुझवला गेला . सीआरझेड आणि इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र असून देखील या ठिकाणी वारेमाप भराव करून डोंगर फोडले , भरणी करून बांधकामे व भूखंड तयार केले गेले आहेत . नैसर्गिक ओढे नष्ट केले गेले . त्यामुळे पावसाळ्यात डोंगरावरून येणारे पाण्याचे लोंढे सामावून घेण्याचे क्षेत्रच नष्ट झाल्याने पाणी हे फाउंटन ते जुन्या टोलनाका दरम्यानच्या घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात तुंबून राहते . 

काजूपाडा , चेणे भागातील परिस्थिती सुद्धा बिकट झाली असून घोडबंदर मार्गावर वाहतूक बंद करावी लागते . येथे देखील इकोसेन्सेटिव्ह व कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात तसेच लक्ष्मी नदीच्या पात्र - परिसरात प्रचंड प्रमाणात बेकायदा भराव केले गेले आहेत . भराव करून अनेक हॉटेल व बांधकामे, झोपडपट्टी उभारली गेली आहेत . हे सर्व करताना नैसर्गिक ओढे - नाले बुझवले वा अरुंद केले गेले . लक्ष्मी नदी पात्रात भराव प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन न्यायालयाने देखील कार्यवाही चे आदेश दिले होते . परंतु याचिकाकर्त्याने त्याचे या भागातील जमीन व घर विकून टाकत याची मागे घेतली . 

पावसाळ्यात दरवर्षी घोडबंदर मार्ग पाणी तुंबल्याने वाहतुकीसाठी बंद होऊन लोकांना तासन तास वाहनांत अडकून पडावे लागत आहे . त्यांचे हाल होत आहेत . विशेष म्हणजे कायदे - नियमांसह न्यायालयांच्या आदेशांचे उल्लंघन होऊन बेकायदा भराव आणि बांधकामे होत असताना प्रशासनाच्या संगनमताने ठोस कारवाई होत नसल्याने घोडबंदर सारखा महत्वाचा महामार्ग पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद करण्याची नामुष्की ओढवत आहे . 

येथील डोंगर फोडणे व झाडे नष्ट करणे, नैसर्गिक तसेच इकोसेन्सेटिव्ह क्षेत्र , लक्ष्मी नदी पात्र , पाणथळ , कांदळवन - सीआरझेड क्षेत्रात झालेल्या भराव व बांधकामां प्रकरणी गुन्हे दाखल करून भराव - बांधकामे काढून घेण्याची मागणी होत आहे . 

Web Title: ghodbunder road is sinking due to construction filling in lakshmi river basin and eco sensitive zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.