वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा घोडबंदर मार्ग यंदाही पाण्याखाली जाण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:23 PM2021-06-02T16:23:26+5:302021-06-02T16:23:34+5:30
वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात .
मीरारोड - इको सेन्सेटिव्ह झोन असून देखील नदी व नैसर्गिक ओढ्यात तसेच परिसरात प्रचंड प्रमाणात झालेल्या भरावा मुळे वरसावे नाका ते काजूपाडा दरम्यानच्या घोडबंदर महामार्गावर यंदासुद्धा पावसाळ्यात पाणी साचून रस्ता बंद होण्याची भीती आहे . वाहतूक पोलिसांनी ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ह्या भागाची पाहणी केली . परंतु मीरा भाईंदर महापालिकेने मात्र ह्या पाहणी कडे पाठ फिरवत समस्ये बाबत गांभीर्य दाखवले नाही .
वरसावे ते चेणे परिसरात लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे खाली वाहून येतात . हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन आहे . वरसावे येथील अनुहा लॉज जवळच्या परिसरात प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे . येथून महामार्गाचे खालून जाणारी नैसर्गिक उपखाडी तर भराव करून अतिशय अरुंद केली असून महापालिकेने तर चक्क काँक्रीटचे बांधकाम करून टाकले आहे.
एक्स्प्रेस इन हॉटेल जवळून जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह सुद्धा नावापुरताच उरला आहे . येथील सी एन रॉक हॉटेल परिसरात प्रचंड माती भराव झाला आहे . चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रातच प्रचंड भराव करून नदीचे पात्र अरुंद बनले आहे . शिवाय परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भराव झालेले आहेत .
इको सेन्सेटिव्ह झोन तसेच नदी व ओढे आणि परिसरात गेल्या काही वर्षात झालेल्या प्रचंड भराव मुळे पावसाळ्यात येथील घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात आहे . जेणे करून ह्या महार्गावरील वाहतूक सुद्धा ठप्प होते . तसेच चेणे गावात सुद्धा पूर येतो .
स्थानिक ग्रामस्थ आणि आदिवासी पाड्यातील रहिवाश्यांनी ह्या भरावा विरोधात तक्रारी केल्या असल्या तरी त्यांना कोणी दाद देत नाही . येथिल अजय पाठक ह्यांनी तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . न्यायालयाने आदेश देऊन देखील महापालिकेने अजून काही कारवाई केलेली नाही.
घोडबंदर महामार्ग पाण्याखाली जात असल्याने त्यावर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मीरा भाईंदर महापालिकेस पत्र दिले होते . परंतु पालिकेने सदर रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचे वाहतूक शाखेला कळवले असे सूत्रांनी सांगितले.
त्या अनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश भामे , उपनिरीक्षक एम . जी . पाटील सह ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिंदे , हिवरे , खिलारे यांनी संयुक्तपणे वरसावे नाका ते काजूपाडा भागाची पाहणी केली . यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना करता येतील ह्यावर चर्चा झाली . ह्या पाहणी दौऱ्या नंतर आवश्यक कार्यवाहीचा अहवाल नुसार पुढील पावले उचलली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले .