घोडबंदरला मिळणार वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी, महापालिकेने केला स्टेमकडे पत्रव्यवहार
By अजित मांडके | Published: February 2, 2024 04:07 PM2024-02-02T16:07:40+5:302024-02-02T16:07:54+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.
ठाणे : घोडबंदरच्या पाण्याच्या मुद्यावरुन मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा रान पेटले आहे. येथील नागरीकांना पाण्याच्या समस्या मांडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील वाढीव पाण्याची मागणी केली होती. अखेर ठाणे महापालिकेने घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. हे वाढीव पाणी मिळण्यास एक महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. परंतु हे वाढीव पाच दशलक्ष लीटर पाणी घोडबंदरला पुरेसे ठरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु असे असले तरी आजही ठाण्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात घोडबंदर भागाला तर याची झळ अधिक बसत आहे. या भागाला कमी पाणी पुरवठा होत असल्याने त्याचा फायदा टँकर माफीया घेत आहेत. त्यामुळे अनेक सोसायटींना टँकरचेच बिल महिनाकाठी ४ ते ५ लाख जात आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या पाण्या संदर्भातील पहिल्या बैठकीत घोडबंदरचा पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून आले. घोडबंदरला पाणी वाढविण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी घोडबंदरला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे. तर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या भागाला १०० एमएलडी पाणी दिले तरी कमी पडणार असल्याची भुमिका विषद केली आहे. त्यात आता माजी खासदार संजीव नाईक यांनी याच मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेत वाढीव पाण्याची मागणी केली आहे.
घोडबंदर भागाची लोकसंख्या सद्यस्थितीला ५ ते ७ लाखांच्या वर गेली आहे. या भागाला सध्या प्रतीदिन ११० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु तो देखील अपुरा पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या भागाला वाढीव ५ दशलक्ष लीटर मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी देखील महापालिकेने वाढीव पाण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु त्याला फारसा यश आलेले दिसून आले नाही. परंतु आता महिनाभरात घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळेल असे दावा पालिकेने केला आहे. परंतु पुढील महिन्यापासून उन्हाळा उजाडणार असल्याने पाणी टंचाईचे ढग आणखी तीव्र होणार आहेत. त्यामुळे हा वाढीव पाणी पुरवठा घोडबंदरकरांना मिळाला नाही तर मात्र त्यांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.