निचऱ्याअभावी घोडबंदर यंदाही तुंबणार
By admin | Published: June 15, 2017 03:01 AM2017-06-15T03:01:01+5:302017-06-15T03:01:01+5:30
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका घोडबंदर भागातील अनेक वसाहतींना बसला होता. येथील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका घोडबंदर भागातील अनेक वसाहतींना बसला होता. येथील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी येथील मुख्य रस्त्यावरील मोऱ्यांचे रुंदीकरण करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता पावसाळा सुरू झाला, तरी हा प्रस्ताव कागदावरच आहे. मोऱ्या बांधण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून रस्ते विकास महामंडळाने या कामाचा खर्च महापालिकेने द्यावा, असा प्रस्ताव दिला आहे. रस्ते विकास महामंडळाने हात वर केल्याने पालिकेने आता यासाठी आवश्यक असलेला ८ कोटी निधी खर्च करण्याची तयारी दर्शवली असली तरी ही प्रक्रि या पूर्ण होण्यास काही कालावधी जाणार असल्याने यंदाही घोडबंदर परिसर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षांत घोडबंदर भागात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. अनेक विकासकांचे मोठमोठे विकास प्रकल्प या भागात उभे राहत आहेत. याच भागात राज्य सरकारने काही विशेष नागरी वसाहतींना परवानगी दिली असून लोढा, रुस्तमजी, कल्पतरू, हिरानंदानी अशा बड्या बिल्डरांच्या टोलेजंग वसाहतींमधून हजारोंच्या संख्येने कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास आली आहेत. दिवसागणिक ही संख्या वाढू लागल्याने घोडबंदर मार्गावर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. एकीकडे येथील वाहतूककोंडी दूर करण्याचे आव्हान पोलीस आणि महापालिका प्रशासनापुढे असतानाच दुसरीकडे पावसाळ्यात या मार्गावर पूरपरिस्थिती निर्माण होऊ लागल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढू लागली आहे. या मार्गावरील कापूरबावडीनाका ते गायमुखदरम्यान मुख्य रस्त्यावरील अरुंद मोऱ्यांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्याने या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे महापालिका आणि रस्ते विकास महामंडळाने केलेल्या पाहणीत आढळून आले. या अरुंद मोऱ्यांमुळे पातलीपाडा जंक्शन, वाघबीळनाका, ओवळा चौक आणि गायमुख भागात प्रामुख्याने पाणी तुंबत असल्याचे निदर्शनास आले. हा परिसर, मुख्य रस्ता, आसपासच्या वसाहतींमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मागील वर्षी येथील रहिवासी हैराण झाले होते.
या परिस्थितीमुळे घोडबंदर मार्गावर नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहप्रकल्पांमधील घरांच्या विक्रीवरदेखील परिणाम होण्याची भीती बिल्डरांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे महापालिकेने यातून तत्काळ मार्ग काढावा, असा आग्रह बिल्डरांनीही धरला होता.
पालिकेने आता या प्रकल्पासाठी सविस्तर अहवाल तयार केला असून या कामासाठी ७ कोटी ९५ लाख रु पयांचा निधी रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. परंतु, प्रत्यक्षात हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच कामाला सुरुवात होणार असल्याने यंदाही घोडबंदरला पुराच्या पाण्याचा धोका कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने रस्ते विकास महामंडळातील संबंधितांबरोबर बैठक घेऊन मोऱ्या रु ंद करण्याचा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, रस्ते विकास महामंडळाने तब्बल १० कोटी रु पयांचे अंदाजपत्रक तयार केले.
या कामासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे यासाठी अर्थसहाय्य मागण्यात आले. मात्र, हे काम तातडीने करायचे असल्याने एमएमआरडीएने त्यासाठी घाईघाईने अर्थसहाय्य देण्यास असमर्थता दर्शवली होती.
त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने पुन्हा महापालिकेकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव मांडला. या सगळ्या प्रक्रि येत संपूर्ण वर्ष सरले आहे. त्यात आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु, अद्यापही या वाटाघाटीत रस्त्यांच्या मोऱ्यांचे काम मात्र सुरू झालेले नाही.