घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस
By अजित मांडके | Published: May 28, 2024 04:16 PM2024-05-28T16:16:17+5:302024-05-28T16:16:33+5:30
कारवाईची आनंद परांजपे यांची मागणी
ठाणे : घोडबंदर, येऊर, कोलशेत, टिकुजी-नी-वाडी, बाळकुम आदीसह कशेळी भागात आजही राजरोसपणे अनधिकृत पब, बार, हुक्का पार्लर सुरु आहेत. त्यावर अद्यापही कारवाई केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. टिकुजी-नी-वाडी परिसरात असलेल्या बार, पब मध्ये मध्यरात्रीपर्यंत तरुण तरुणांचा धिगाणा सुरु असतो, रात्रीच्या सुमारास येथील रस्ते देखील या मद्यपींमुळे गजबजल्याचे दिसत आहेत. त्यात कशेळी भागात खाडी किनारी, खाडी बुजवून येथे पहाटे पर्यंत धिंगाणा सुरु असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांनी लक्ष घालून हे पब, बारवर कारवाई करावी. तसेच मद्य पिऊन वाहन चालविणाºयांच्या विरोधात वाहतुक विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
घोडबंदर रोडवरील शेतजमीन आणि वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे करून बेकायदा हॉटेल्स, बार आणि हुक्का पार्लर वर कारवाई काही दिवसापूर्वी झाली. परंतु पुण्यातील बार व पब्ज मधून मद्यपान करुन ड्रिंक अँड ड्राइव्ह अपघात झालेली घटना ताजी असतानाच आता त्याचीच पुनरावॄत्तीची घटना ठाण्यातही घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कशेळी खाडी किनारी सीआरझेड धाबे जोरात राजरोसपणे, पहाटे पर्यत सुरु असतात. कोलशेत, बाळकुम येथे देखील अशीच काहीशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यातही अशा पध्दतीने पब, बार, हुक्का पार्लर चालविणाऱ्यांकडे अग्निशमन विभागाचाही परवाना नसल्याचे दिसून आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची खाडी किनारी अनधिकृतपणे मद्यविक्रीस परवानगी नसतानाही मद्यविक्री राजरोसपणे बिनधास्तपणे सुरू आहे. या खाडीपरिसरात ध्वनिप्रदूषणास बंदी आहे. मात्र तरीही पहाटे पर्यंत धिंगाणा सुरु असल्याचे चित्र आहे.
असेच काहीसे चित्र टिकुजी-नी-वाडी परिसरात देखील दिसून येत आहे. या ठिकाणी पबमध्ये तर तरुण तरुणींचा तांडाच रात्री ११ नंतर येथे गिरट्या घालतांना दिसून येत असतो. तो मध्यरात्री पर्यंत या भागात धिंगाणा सुरुच असतो. मात्र त्याकडेही कोणाकडेही लक्ष जात नसल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अशा पब, बार, हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी आनंद परांजपे यांनी पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी देखील मद्य प्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात मनुष्यबळ वाढवून कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. घोडबंदर, येऊर या भागात अशा पध्दतीने सुरु असलेल्या पब आणि हुक्का पार्लरवर तत्काळ कारवाई करावी असेही ते म्हणाले.