गणपती मंडपाजवळ आढळली घोरपड, वाईल्ड वेल्फेअरने केली सुटका
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 3, 2022 11:55 PM2022-09-03T23:55:59+5:302022-09-03T23:58:19+5:30
आज दुपारी ४ च्या सुमारास कन्हैया नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बांधण्यात आलेल्या मंडपाजवळ घोरपड तेथील नागरिकांना दिसल्यावर त्यांनी लगेचच वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनला संपर्क साधला
ठाणे : गणपती मंडपाजवळ आलेल्या घोरपडीची शनिवारी सायंकाळी सुटका करण्यात आली. कोपरी येथील कन्हैयानगर परिसरात ही घटना घडली. वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनने ही सुटका केली असून वनविभागाच्या मदतीने तिला लगेचच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
आज दुपारी ४ च्या सुमारास कन्हैया नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बांधण्यात आलेल्या मंडपाजवळ घोरपड तेथील नागरिकांना दिसल्यावर त्यांनी लगेचच वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनला संपर्क साधला असता अवघ्या काही मिनिटांतच आशिष साळुंखे आणि वैभव प्रजापती हे दोन स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले. ते पोहोचल्यानंतर ती घोरपड लगेचच तेथून निघून चारचाकी वाहनात शिरली. ती घोरपड शोधत असताना एका वॉचमनने तिला गाडीत शिरताना पाहिले आणि त्यांनी स्वयंसेवकांना तशी माहिती दिली. गाडीचे बोनट खोलून तिला बाहेर काढण्यात आले. तिच्या पोटावर दोन जुन्या जखमा होत्या. परंतू त्या भरुन निघाल्या होत्या असे आशिषने सांगितले. घोरपड पाहताच आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांची भंबेरी उडाली होती. एखादे वन्यजीव आढळल्यास ते वनविभागाच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडले जाते असे वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आदीत्य पाटील यांनी सांगितले.