घुमला शाहिरांचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 02:24 AM2016-01-21T02:24:21+5:302016-01-21T02:24:21+5:30

गायक नंदेश उमप यांनी सादर केलेला पोवाडा, शिवाय कोळीनृत्य, जाखडी नृत्य, ठाणे-मुंबईतील शाहिरांनी दमदार आवाजात सादर केलेली गीते

Ghumah Shahir's voice | घुमला शाहिरांचा आवाज

घुमला शाहिरांचा आवाज

Next

ठाणे : गायक नंदेश उमप यांनी सादर केलेला पोवाडा, शिवाय कोळीनृत्य, जाखडी नृत्य, ठाणे-मुंबईतील शाहिरांनी दमदार आवाजात सादर केलेली गीते, रसिकांचा उदंड प्रतिसाद यातून ठाण्यात प्रथमच आयोजित केलेला महाराष्ट्र शाहिरी लोककला महोत्सव चांगलाच रंगला. तरुणांनाही लाजवेल अशा उत्साहात ७८ वर्षीय शाहीर कृष्णकांत जाधव यांनी सादर केलेल्या संयुक्त महाराष्ट्रावरच्या गोंधळाला ज्येष्ठांबरोबर तरुणांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी शिवाजी मैदानात शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवातीला ह.भ.प. दयानंद भोईर यांच्या नेतृत्वाखाली जांभळी नाका येथील गणपती मंदिर ते शिवाजी मैदानादरम्यान महोत्सवाची दिंडी काढण्यात आली. गणेशवंदनेनंतर शाहीर मधू खामकर आणि निलेश जाधव यांनी गण सादर केले. जय मल्हार नृत्याविष्काराने वातावरण भारून टाकले. खंडोबाच्या भूमिकेत संजीव मोरेकर यांचा प्रवेश होताच प्रेक्षकांतून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा आवाज निनादू लागला. ‘जयदेवा जयदेवा जय शिवमार्तंडा,’ ‘बानू बया बानू बया’ या गीतांवर नृत्य सादर होताच प्रेक्षकांनी परिसर डोक्यावर घेतला. या नृत्याविष्कारावर प्रेक्षकांच्या नजरा अक्षरश: खिळल्या. नृत्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सादर करण्यात आला. श्रेयसी व संस्कृती नाखवा नृत्यदिग्दर्शित जोगवा, पौर्णिमा सूर्यवंशी हिने महाराष्ट्राची लावणी, लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया यांचे सादरीकरण केले, तर शाहीर शांताराम चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित पोवाडा, शाहीर निलेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा, किरण ढोले यांनी खेळ मांडला, शाहीर शांताराम धनावडे यांनी माझी मैना गावाकडे राहिली आदी गीते सादर केली. गायिका शकुंतला जाधव यांनी बाबू टांगेवाला, अहो आबा..., मना लगीन कराया पाहिजे सादर करत वाहवा मिळवली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असा संदेश देणाऱ्या गीताचे शाहीर अर्जुन अटाळीकर यांनी सादरीकरण केले. डॉ. प्रमोद नलावडे यांनी सादर केलेल्या दादा कोंडके पॅच आणि फू बाई फू फेम संतोष पवार यांच्या विनोदी प्रहसनांनी खसखस पिकवली.
शाहीर दत्ता ठुले यांनी सादर केलेल्या विंचू चावला या भारुडाला रसिकांनी भरभरून दाद दिली. कोळीनृत्याने महोत्सवाचा समारोप करण्यात आला. शाहीर महादेव शेरेकर, पखवाजवादक रणजित परब, शाहीर निलेश जाधव, नृत्यांगना अप्सरा जळगावकर, लोककलावंत विनोद नाखवा, संतोष पवार, शिल्पकार देवानंद पाटील, डॉ. प्रमोद नलावडे, अशोक हांडे, जादूगार ज्ञानेश्वर डोंगरे, शाहीर मधू खामकर, साहित्यिक-कवी महेंद्र कोंडे, गायक नंदेश उमप, शाहीर अर्जुन अटाळीकर, शाहीर तुकाराम मानकर, गायिका शकुंतला जाधव आदींना महाराष्ट्र लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Ghumah Shahir's voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.