ठाण्यामध्ये आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मुलीची आत्महत्या
By admin | Published: July 9, 2017 08:25 PM2017-07-09T20:25:34+5:302017-07-09T20:25:42+5:30
आईच्या मृत्यूने वैफल्यग्रस्त झालेल्या हेतल धीरज परमार (37) या विवाहितेने ठाण्यातील माजीवडा येथील रुस्तमजी अरबेनिया या
आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 9 - आईच्या मृत्यूने वैफल्यग्रस्त झालेल्या हेतल धीरज परमार (३७) या विवाहितेने ठाण्यातील माजीवडा येथील रुस्तमजी अरबेनिया या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी घेऊन रविवारी सकाळी आत्महत्या केली. पहाटेच ती अमेरिकेहून आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आली होती. पुण्याला अंत्यसंस्काराला जाण्यापूर्वीच तिने आपली जीवनयात्रा संपविली. हेतल यांचे पती धीरज हे अमेरिकेत संगणक अभियंता (सॉफ्टवेअर) असल्यामुळे त्याही पतीबरोबर परदेशी वास्तव्याला होत्या. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे आईच्या अंत्यसंस्कारासाठी त्या रविवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास ठाण्यातील आपल्या रुस्तमजी अरबेनियाच्या ऐंचाना बिल्डींगमधील सासरी आल्या. ठाण्यातूनच त्या पुण्याला जाणार होत्या. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. त्यांच्या बॅगेत काही औषधेही मिळाली असून, त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते, असे पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. आईच्या विरहातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची शक्यता, प्राथमिक तपासात उघड होत असल्याचे पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे 27 व्या मजल्यावरून पडूनही हेतल यांच्या डोक्याला फारशी काही जखम नव्हती. केवळ, हृदय, पोट आणि हाताला तसेच कंबरेचा भाग मोडून अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या डॉ. शिल्पा सहारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आईवर नि:सीम प्रेम आईवरील प्रेमापोटीच लग्नानंतर पती अमेरिकेला असूनही तिची तिकडे जायची तयारी नव्हती; पण, तशीच मनाची तयारी करीत ती पतीसमवेत अमेरिकेला वास्तव्याला होती. सासू सासऱ्यांची चुकामुक झाली आणि हेतल मुंबईत येणार असल्यामुळे तिला घेण्यासाठी तिचे सासू सासरे हे मुंबई विमानतळावर तिची वाट पहात उभे होते. तिथून ते तिघेही पुण्याला जाणार होते. तिचा मोबाइल बंद असल्यामुळे ती मुंबईतून थेट ठाण्यात आली. तिथे घर बंद पाहिल्यानंतर पहाटेच्याच सुमारास तिने उडी घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकाचवेळी दोघींवर अंत्यसंस्कार एकीकडे आईच्या अंत्यसंस्कारासाठी मुलगी अमेरिकेहून मुंबईत आली; पण, आईच्या अतिव प्रेमापोटी तिनेही आत्महत्येचे पाऊल उचलले. पुण्यात मुलगी येणार म्हणून आईचे पार्थिव तसेच ठेवले होते. आता तिच्याही मृत्यूमुळे दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे तिच्या भावाने पोलिसांना सांगितले. आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्यामुळे तिचा मृतदेह सासू सासऱ्यांच्या ताब्यात द्यावा, असेही त्याने सांगितले.