मुलीनेच चक्क आईला अडकवले शरीरविक्रयाच्या व्यवसायात, पोलिसांनी केली दोघींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 08:45 PM2017-11-29T20:45:28+5:302017-11-29T20:45:59+5:30
पैशांचे आमिष दाखवून अन्य कोणी नाही, तर पोटच्या मुलीनेच जन्मदात्या आईला शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून अन्य कोणी नाही, तर पोटच्या मुलीनेच जन्मदात्या आईला शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. यात त्या आईसह दोन पीडित महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विष्णुनगर पोलिसांच्या सहकार्याने मंगळवारी सुटका केली. यातील मुलीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एरव्ही, आईवडिलांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पोटच्या मुलाला किंवा मुलीला विकल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. डोंबिवलीत मात्र हेमा करोतिया (२३) या दलाल तरुणीने चक्क आपल्याच आईला शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे दौंडकर यांच्यासह उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, पोलीस नाईक अंकिता मिसाळ, निशा कारंडे तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे जमादार पी. बी. परुळेकर, नाईक एस. जी. थोरात, ए.आर. गोगरकर, एस. पी. माने आणि पी.के. सावंत आदींच्या पथकाने मंगळवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील ‘रायगड’ इमारतीमधील ‘हॉटेल विहार प्युअर व्हेज रिफ्रेशमेंट लंच होम’ या हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यानंतर दलाल तरुणीची ४६ वर्षीय आई तसेच त्यांच्या शेजारी राहणारी २५ वर्षीय तरुणी अशा दोघींची सुटका केली. याप्रकरणी हेमाविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तिने यात आणखी किती मुलींना अडकविले, तिचे यात आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा
यातील अन्य २५ वर्षीय पिडीत तरुणीचा सांभाळ केवळ आईने केला. तिच्या लहानपणीच वडील निघून गेले. तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हेमाने तिला या व्यवसायात अडकवले. एका कामात चांगले पैसे मिळतील, असे सांगून तिने नंतर चक्क आईलाही यात अडकवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाल्यावर छापा टाकणाºया पथकालाही धक्का बसला. कहर म्हणजे पुन्हा मुलीनेही यात आईवरच उलटसुलट आरोप करून आपण कसे निर्दोष आहोत, असा कांगावा पोलिसांसमोर केला.
दोन हजारांत ‘सौदा’
फोनद्वारे शरीरविक्रयासाठी मुली उपलब्ध असल्याचे हेमा ग्राहकांना सांगायची. त्यातून फोनवरूनच एका वेळी एका मुलीसाठी दोन हजारांचा ती सौदा करून त्यातील एक हजार रुपये स्वत:कडे ठेवून उर्वरित पैसे संबंधित मुलीला देत असे. आधी इतर मुलींना नंतर आपल्याच आईला तिने यात गोवले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून आईसह तिच्या शेजारणीचीही सुटका केली.