बालविवाह लावून दिल्याने मुलीनेच नोंदवला वऱ्हाडींवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:51+5:302021-09-23T04:46:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मुलगी अल्पवयीन असताना तिची शिकण्याची इच्छा दडपून टाकून तिचा बळजबरीने बालविवाह लावून देणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मुलगी अल्पवयीन असताना तिची शिकण्याची इच्छा दडपून टाकून तिचा बळजबरीने बालविवाह लावून देणाऱ्या आईवडिलांसह माहेर व सासरची मंडळी, भटजी आणि लग्नातील वऱ्हाडींवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशिमीरा भागात राहणारी पीडिता ही गेल्या वर्षी १७ वर्षांची होती व ११ वीत शिकत होती. परंतु, गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागले आणि मे २०२० मध्ये तिचे आईवडील, भाऊ हे तिला उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कोराळ या मूळगावी घेऊन गेले. तेथे त्यांनी तिचे लग्न सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या हुंडेगाव येथील तरुणाशी निश्चित केले. आपल्याला शिकायचे आहे, अजून मी लहान आहे, असे सांगूनदेखील घरच्यांनी २९ जून २०२० ला तिचे लग्न बळजबरीने त्या तरुणाच्या मूळगावी लावून दिले. लग्नानंतर सासरी पती, सासू-सासरे हे तिला घरात कोंडून ठेवायचे, शिवीगाळ करून त्रास द्यायचे म्हणून ती तिच्या आजी-आजोबांकडे गेली. जानेवारी २०२१ मध्ये ती आईवडिलांसह काशिमीरा येथे घरी परत आली. घरचे तिच्यामागे सासरी जाण्यास तगादा लावत होते.
मुलीला ठेवले निवारा केंद्रात
- मुलीने चाईल्ड लाईन संस्थेशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्या संस्थेने ३१ ऑगस्ट रोजी काशिमीरा पोलिसात तक्रार अर्ज दिला. मुलीला संस्थेच्या माध्यमातून बोरिवलीच्या एका निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे.
- १८ सप्टेंबरला पीडितेच्या फिर्यादीनुसार बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मुलीचे आई-वडील, पती, सासू-सासरे, मामा, लग्न लावून देणारे भटजी व लग्नास उपस्थित वऱ्हाडी आदींचा समावेश आहे.
---------------