हद्द झाली... व्हॉट्सअॅपच्या 'व्यसना'साठी अंबरनाथची तरुणी आई-बाबांना सोडून निघून गेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 01:30 PM2018-03-23T13:30:25+5:302018-03-23T13:30:25+5:30
आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेली होती...
ठाणे - फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हा आज प्रत्येकाच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्याने 'इंटरनेट अॅडिक्शन'चे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आलं आहे. अंबरनाथमध्ये सतत व्हॉट्सअॅप वापरत असल्यावरुन कुटुबींयांनी बोललं म्हणून एका 17 वर्षीय तरुणीने घर सोडल्याची घटना समोर आली आहे. सतत व्हॉट्सअॅप वापरण्यात गुंग असल्यामुळे पालक रागावले होते, पण पालकांचा राग या तरुणींनी मनात धरुन थेट घरातूनच पलायन केले आहे. मात्र एका सतर्क नागरिकामुळं आणि नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अंबरनाथ पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले. आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे मुलीने सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
एका सहलीवरुन घरी परतल्यानंतर ती व्हॉट्सअपवर ती मित्रमैत्रिणींचे फोटो पाहत होती. त्यामुळे मुलीची आई तिला रागावली. याच रागातून तिने घरातून पलायन केले होते. ही मुलगी नवी मुंबई येथे एका महिलेला भयभीत अवस्थेत आढळली होती. मुलीने आईवडिलांकडे जायचे असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्या महिलेने या मुलीला नवी मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नेले. तेथे पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता, ही मुलगी अंबरनाथ येथील राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्याशी संपर्क करत माहिती दिली आणि अंबरनाथ पोलिसांकडे तिला सुरक्षित सोपवले होते.