ठाणे स्थानकात गर्दीमुळे तरुणी गुदमरली; तीन पुरुषही जखमी, मात्र नोंद नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 05:55 AM2019-07-04T05:55:58+5:302019-07-04T06:00:04+5:30
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.
ठाणे : मुंबई, ठाणे परिसरात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ठप्प झालेली ठाणे-मुंबई या मार्गावरील रेल्वेसेवा अद्याप सुरळीत झालेली नाही. त्यातच, रेल्वे प्रशासनाने बुधवारी रविवारचे वेळापत्रक जाहीर केल्याने प्रवाशांच्या हालात आणखी भर पडली.
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे मुंब्य्राहून आलेल्या तरुणीला ठाण्यात उतरताच गुदमरून चक्कर आली. तिला आरपीएफ जवानांनी प्रथमोपचार केंद्रात नेले. तेथे उपचार करून तिच्या पालकांबरोबर तिला घरी पाठविण्यात आले. तर, मुंब्रा स्थानकात नाजमीन मोहम्मद इब्राहिम शेख (३६) ही महिला लोकलमधून पडून जखमी झाल्याची नोंद ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात झाली आहे. तसेच अन्य तिघे जखमी झाले; मात्र त्यांची नोंद नसल्याचे लोहमार्ग आणि आरपीएफ पोलिसांनी सांगितले.
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या स्थानकांत येणाऱ्या गाड्या बुधवारी जवळपास अर्धा तास उशिराने येत होत्या. मुंब्रा-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान गर्दीमुळे चार प्रवासी पडून जखमी झाले. यामध्ये जखमी झालेल्या मुंब्य्रातील नाजमीन शेख यांच्या कंबरेला, हातपाय आणि मानेला दुखापत झाली. त्यांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. तर, नाजीर शेख हा तरुण गर्दीमुळे धावत्या लोकलमधून रुळांवर पडून त्याच्या पायाला दुखापत झाली.
निखिलेश कुबल हा तरुणही मुंब्रा-कळवादरम्यान पडला असून त्याच्या डोक्याला मार लागला. तर अन्य एका जखमी तरुणाचे नाव समजू शकले नाही. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यातील फलाट क्र मांक-४ आणि ६ वरील प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरपीएफ, जीआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात करण्यात आले होते.
नऊ विशेष गाड्या सीएसएमटीला रवाना
ठाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी गर्दी झाल्याने ठाणे रेल्वे प्रशासनाने सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ठाणे-सीएसएमटी सात आणि ठाणे-घाटकोपर दोन अशा नऊ विशेष गाड्या रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारचे वेळापत्रक लागू केल्याने ठाण्यात १० ते १५ गाड्या रद्द झाल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाने दिली.
गाड्या वाढविण्याची मागणी
बुधवारी ठाणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनोने यांनी ठाणे रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. मीना यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अशा अप आणि डाउन महिला विशेष गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी के ली.